मुंबई - भाजप आमदार प्रसाद लाड यांची महाराष्ट्र प्रदेश `समन्वयक` पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली.
मुंबईतील भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून लाड यांची ओळख आहे. याआधी त्यांची विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता प्रदेश `समन्वयक` पदी नेमणूक करीत त्यांना संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष आणि राज्य सरकारमधील मंत्री यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतील. लाड हे दर मंगळवार आणि बुधवारी नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहतील.
'भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकारमधील समन्वयक म्हणून नवे दायित्व सोपविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता या नात्याने, पक्ष नेतृत्वाने दिलेली ही जबाबदारी पार पाडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील घटक पक्षांची ही महायुती भक्कम आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर मंगळवार आणि बुधवारी मी प्रदेश कार्यालयात उपस्थित असेन', अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.