‘हमास’च्या जगभरातील समर्थकांना रस्त्यावर उतरण्यासाठी जॉर्ज सोरोसने निधीपुरवठा करणे म्हणजे जागतिक अशांततेसाठी रचलेले आणखी एक कुटील षड्यंत्रच. त्यामुळे अब्जाधीश असला तरी अशा ज्यूविरोधी, लोकशाहीविरोधी, भारतद्वेष्ट्या प्रवृत्तीच्या सोरोस आणि त्याच्या संस्थांच्या मुसक्या आवळणे हेच जागतिक शांतीच्या हिताचे ठरावे.
कुप्रसिद्ध उद्योजक आणि परोपकाराचा वैश्विक देखावा उभ्या करणार्या जॉर्ज सोरोसने २०१६ पासून ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या समर्थकांना तब्बल १५ दशलक्ष डॉलरचा निधी पुरवण्याची खळबळजनक माहिती उजेडात आली असली, तरी सोरोसच्या मानसिकतेचा विचार करता, ती अनपेक्षित नक्कीच नाही. अमेरिका, युरोपमध्ये ‘हमास’च्या समर्थनार्थ जी निदर्शने होत आहेत, त्यांनाही सोरोसचे आर्थिक पाठबळ लाभल्याचे समोर आले. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या कारवाईचा अमेरिकेत तीव्र निषेध करण्यात आला. तिथेही याच सोरोसचा पैसा नाचताना दिसतो. एकूणच काय तर ज्या संघटना जगभरात इस्रायलविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, त्यांना या हंगेरीयन-अमेरिकन अब्जाधीशाने अर्थसाहाय्य करुन उकसवल्याचे स्पष्ट होते.
७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, एका संघटनेने समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, इस्रायली वसाहतीधारकांना असे वाटत होते की, ते दोन दशलक्ष लोकांना अनिश्चित काळासाठी खुल्या तुरुंगात ते डांबू शकतात. कोणताही पिंजरा आव्हान देत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ सोरोस मुक्त हाताने पैसे वाटत फिरतोय.
अमेरिकेत इस्रायलविरोधी सर्वाधिक निदर्शने होत असून तेथील एनजीओंनाच सर्वाधिक निधी पुरवठा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. या एनजीओ इस्रायलच्या म्हणजेच ज्यूंच्या निर्मूलनासाठीचे आवाहन करुन आगीत तेल ओतण्याचेच उद्योग करताना दिसतात. इस्रायलचा वर्णद्वेष, जगभरात इस्रायलींचे व्यवसायावर असलेले नियंत्रण तसेच त्यांच्या दडपशाहीला अमेरिका देत असलेले प्रोत्साहन, या सर्व बाबी हिंसाचाराला कारणीभूत आहेत, असे मत सोरोसपुरस्कृत गँगने व्यक्त केले आहे. सोरोस आणि त्याचा मुलगा जगभरातील कट्टरपंथीयांना पाठिंबा देतो. म्हणूनच ‘हमास’लाही त्यांच्याकडून निधी मिळतो, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट व्हावे.
जगातील सर्वच कट्टरपंथीयांना सोरोस निधी पुरवतो. त्यांनी हिंसक कारवाया कराव्यात यासाठी अर्थबळ दिले जाते. त्यापैकीच एक म्हणजे ‘हमास’. खरं तर सोरोसचा हाच खरा व्यवसाय. त्याचा हा खरा चेहरा किती विकृत आहे, हे यावरुन अधोरेखित व्हावे. हा तोच जॉर्ज सोरोस आहे, ज्याने भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार देशाला लाभल्यानंतर भारताविरोधी शक्तींना बळ दिले. भारतातील लोकशाही खिळखिळी करून येथील सरकार उलथवून लावण्याचा कटही आखला. त्यासाठी तुकडे तुकडे गँगला रसद पुरविणारा भारतद्वेष्टा म्हणजे हाच सोरोस!
२०२० मध्ये दावोस येथे ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या एका कार्यक्रमात बोलताना त्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना, “राष्ट्रवादाची प्रगती होते आहे, त्याचा सर्वात मोठा फटका भारतात बसला आहे,” असे विधान केले होते. जॉर्ज सोरोस हा ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ या संस्थेचा संस्थापक असून, पंतप्रधान मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी ज्या शक्ती काम करत आहेत, त्या टूलकिट गँगचा सोरोस हा खरा सूत्रधार. ‘ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स’मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही त्याचे नाव. त्याची वैयक्तिक संपत्ती ८.५ अब्ज डॉलर्स इतकी असून, भारतीय रुपयांत त्याचे मूल्य तब्बल ५० हजार कोटींहून अधिक आहे.
सोरोसच्या मते, लोकशाहीवादी, पारदर्शक आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी काम करणार्या गटांना तो निधी पुरवतो. समतेचे राज्य यावे, यासाठी अनेक देशातली सनदशीर मार्गाने निवडून आलेली सार्वभौम सरकारे उलथून टाकायची, ही त्याची कार्यपद्धती. याला भारतातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले मोदी सरकार मान्य नाही. म्हणून तो भारताच्या विरोधात काम करतो. सोरोसने म्युनिच येथील सुरक्षा परिषदेतील भाषणात अदानी समूहाला बसलेल्या धक्क्यांमुळे मोदी सरकार कमकुवत होईल, असा अजब दावा केला होता. तसेच भारतात मुस्लीम समाजाविरोधात चिथावणी देणे, हा मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक भाग असल्याचे वादग्रस्त वक्तव्यही त्याने केले होते.
हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या विरोधात जो अहवाल प्रकाशित केला होता, त्यानंतर सोरोसने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी तसेच अदानी यांच्याविरोधात घेतलेली भूमिका संशयास्पद अशीच होती. म्हणूनच सोरोस विरोधात टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. सोरोस हा केवळ गांधीजींनी पाश्चात्य सभ्यतेबद्दल सांगितलेल्या सर्व दुष्कृत्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, तर त्याने मोदी सरकारच्या आता रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांना निधी पुरवठा देखील केल्याचा आरोप ‘ऑर्गनायझर’ने आपल्या संपादकीयमध्ये केला होता. शेतकर्यांना बळ देणार्या संसदीय पद्धतीने मंजूर केलेल्या कृषी कायद्यातील सुधारणांविरोधात सोरोसने आंदोलनकर्त्यांना निधी पुरवून बळ दिले. म्हणूनच सोरोसचा लोकशाही पद्धतीशी कोणताही संबंध नाही, हेच सिद्ध होते.
जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून उदयास येत असताना, भारताची प्रतिमा मलीन करण्याचा सातत्याने प्रयत्न होताना दिसतो. काँग्रेसी नेते राहुल गांधी लंडनला जाऊन भारतात लोकशाही धोक्यात आल्याच्या बोंबा ठोकतात. टूलकिट गँग कशा पद्धतीने काम करते, त्याचेच हे उदाहरण. युरोप, अमेरिका आर्थिक मंदीच्या सावटाखाली असताना, भारत मात्र कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प पूर्णत्वाला नेत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल विरोधात असूनही अदानी समूह शेअर बाजारात आपले स्थान राखून आहे. भारतीय अर्थव्यवस्था सर्व आव्हांनाना तोंड देऊन मजबूत होत असताना, सोरोसने घेतलेली भारतविरोधी भूमिका सर्व काही सांगून जाते.
आताही जगभरात वांशिक दंगली उफाळण्याची भीती व्यक्त होते आहे. इस्रायल आणि ‘हमास’ असे दोन गट पडले आहेत. अशावेळी सोरोस ‘हमास’च्या बाजूने उभा असल्याची उघड झालेली माहिती, जगभरातील लोकशाही पद्धती धोक्यात आल्याचेच द्योतक म्हणावी लागेल. पॅलेस्टिनींचे मानवी हक्क संकटात आल्याचे कारण पुढे करत, सोरोस ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत आहे, हीच खरी धोकादायक बाब. या एनजीओ सोरोस याच्याप्रती कृतज्ञ आहेत, यातच सारे काही आले.
नाझींनी बुडापेस्टवर १९४४ मध्ये कब्जा केला, तेव्हा सोरोस १४ वर्षांचा होता. हजारो हंगेरी ज्यूंना मरणासाठी छळछावणीत पाठवले जात असताना, त्याच्या वडिलांनी ज्यूंच्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्या. यात काहीही गैर नाही, असे सोरोस याने एका मुलाखतीत नमूदही केले आहे. अन्य कोणीतरी त्या ताब्यात घेतल्याच असत्या, अशा शब्दांत वडिलांच्या कृत्याचे समर्थन तो करतो. आपल्या मनात कोणतीही अपराधीपणाची भावना नाही, असेही सोरोसने या मुलाखतीत म्हटले होते. भारताविरोधात कटकारस्थाने आखणार्या सोरोसचा हा विकृत चेहरा म्हणूनच उघड करण्याची गरज म्हणूनच तीव्र होते.