नवी दिल्ली : पॅरा अॅथलीट नारायण ठाकूरने दि. २५ ऑक्टोबर रोजी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.नारायण ठाकूर यांने २९.८३ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला. नारायण टी-३५ प्रकारात खेळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण यांच्या विजयाबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या वर्षी पुण्यात झालेल्या २१व्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत नारायणने १०० आणि २०० मीटर शर्यतीत दोन सुवर्णपदके जिंकली होती. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, नारायणने त्याच्या सुरुवातीच्या आणि संघर्षाच्या दिवसात वेटर आणि डीटीसी बस क्लिनर म्हणून काम केले होते.
त्यांच्या विजयावर वडील मनोज ठाकूर म्हणाले की, मुलाचे यश पाहून त्यांची छाती अभिमानाने भरून येते. नारायण समयपूर बदली येथे नातेवाइकांसह राहतो. सध्या नारायण कोलकाता येथे आयकर विभागात एमटीएस म्हणून कार्यरत आहेत.तसेच नारायणने सांगितले की, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तो गेल्या अनेक महिन्यांपासून सराव करत आहे. तो नेहमी आपल्या गुरूंशी त्याच्या खेळाबद्दल आणि ध्येयांबद्दल बोलत राहतो. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंची शिकवण यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे ते म्हणाले.