नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय आणि राजकीय विश्लेषक शेख शौकत हुसेन यांच्यावर खटला चालवण्यास दिल्ली पोलिसांना परवानगी दिली आहे. या दोघांवर प्रक्षोभक भाषणे देऊन सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवल्याचा आरोप आहे. १० ऑक्टोबर रोजी राज निवासच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
२०१० मध्ये ‘आझादी – द ओन्ली वे’ या बॅनरखाली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची चर्चा करण्यात आली होती. यावेळी अरुंधती रॉय यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. काश्मीर कधीही भारताचा अविभाज्य भाग राहिलेला नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच भारतीय अधिकार्यांनी ही गोष्ट संयुक्त राष्ट्रात मान्य केली असल्याचा खोटा दावाही त्यांनी केला होता. तसेच शेख शौकत हुसेन यांनीही अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.
त्यामुळे काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडित यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या कार्यक्रमात भारत आणि काश्मीर वेगळे करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी आपल्य़ा तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर नवी दिल्लीतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानंतर या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३A,१५३B आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल १३ वर्षांनंतर नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी या दोघांवर खटला चालवण्यास मंजूरी दिली आहे.