नवी दिल्ली : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात हैदराबाद येथे विश्वचषकाचा सामना खेळविला गेला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवानने त्यातही प्रार्थना केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. तर मोहम्मद रिझवानने हैदराबादच्या मैदानावर प्रार्थना केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आता इस्रायल-हमास युद्धावर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद रिझवानने प्रत्युत्तर देत हाताने प्रार्थना करणारा इमोजी शेअर करत ट्विट केले, “हा (श्रीलंकेविरुद्धचा विजय) गाझामध्ये राहणाऱ्या आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. याचे श्रेय संपूर्ण संघाला जाते, विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली, ज्यांनी ते सोपे केले. हैदराबादच्या लोकांचे अप्रतिम आदरातिथ्य आणि सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार.”, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोहम्मद रिझवान हा क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाचा भाग असून एकदिवसीय विश्वचषक सुरू असताना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून १२०० लोकांची हत्या केली आहे. एका गावात ४० हून अधिक मुलांचीही हत्या करण्यात आली. अनेक मुले दगावली. गावात सर्वत्र मृतदेह आढळून आले. पॅलेस्टाईनने इस्रायलवर ५००० रॉकेट डागल्यानंतर हे युद्ध सुरू झाले.