धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका : योगी आदित्यनाथ

    31-Jan-2023
Total Views |




: “सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरु होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करु नका,” अशा शब्दात इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिला. “सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंघ भारताला कुणीही रौखू शकत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. गोद्री ता. जामनेर येथे आयोजित ‘अ.भा.हिंदू गोर बंजारा लबाना व नायकडा समाज मेळाव्या’चा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा, द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज, बाबुसिंह महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच, समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
छेडछाड सहन करणार नाही
“हा ‘कुंभ’ आहे. कुंभाचा भाव म्हणजे सर्वसमावेशक कामनापूर्ती आणि सिद्धीपूर्ती. बंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्म घेतल्याचे सिद्ध केले आहे. सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे.त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे,” असेही योगी म्हणाले. “देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित. म्हणूनच ’अतिथी देव भव’ हा आमचा स्वभाव गुण आहे.त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे. मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील, तर त्यांना भोग भोगावेच लागतील,” असा इशारा योगींनी यावेळी दिला.
टुकडे टुकडे गँगच्या निशाण्यावर आता बंजारा समाज : नितेश राणे
’हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्मात निसर्गाची पूजा केली जात नाही. तरीही टुकडे टुकडे गँगकडून निसर्गपूजेचा संदर्भ देत नेमक्या कुठल्या समाजाविषयी बोलत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. गोर बंजारा हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असून धर्मांतरण आणि हिंदू धर्मविरोधी कारवाया करणार्‍यांच्या निशाण्यावर आता बंजारा समाज आहे,’ असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. ’हिंदूंशिवाय कुठलाही धर्म निसर्ग पूजा करत नाही. सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत, नद्या या सर्व घटकांची हिंदू धर्मात पूजा केली जाते. असे असताना तुकडे तुकडे गँगने अप्रत्यक्षरीत्या नेमक्या कोणत्या निसर्गाविषयी बोलत टिप्पणी करायला सुरुवात केली आहे हे स्पष्ट झालेले नाही. गोर बंजारा हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग होता आणि आहे. आदिवासी समाजाला भारताच्या विरोधात उभे करण्यासाठीचे हे जागतिक षडयंत्र असून मूलनिवासी आणि त्याचा सिद्धांत हे त्याचेच एक रूप आहे. इंग्रजांनी धर्मांतरणाच्या बाबतीत आखलेले दूरदर्शी धोरण स्वातंत्र्यानंतर डाव्यांनी आणि ख्रिश्चनांनी कायम ठेवले असून आता या समाजविघातक घटकांच्या निशाण्यावर बंजारा समाज आहे,’ असा असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
3000 तांड्यांवर धर्मांतरणाचा डाव यशस्वी : बाबुसिंह महाराज
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सध्या अ.भा. हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ’चे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभात बोलताना बंजारा समाजातील महाराज आणि संतांनी समाजावर होणारे धार्मिक आक्रमण आणि धर्मांतरण मोहिमेवर चिंता व्यक्त करत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी बोलताना बाबूसिंह महाराज यांनी देशात सुरु असलेल्या बंजारा धर्मांतरणाची धक्कादायक आकडेवारी देत समाजाला इशारा दिला आहे. ’आठ राज्यातील 11 हजार तांड्यांपैकी 8 राज्यातील 3 हजार तांड्यांवरील बंजारा समाजाचे मिशनर्‍यांकडून धर्मांतरण करण्यात आले आहे. मिशनरींनी थेट संपर्क मोहीम राबवित हे केले आहे. हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजामध्ये जागृती आणण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी या कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धर्मांतरित झालेल्या सर्वांना परत आणले जाईल बंजारा धर्मांतरणाची सुरु असलेली ही मोहीम थांबविली जाईल,’ असा इशारा बाबुसिंह महाराज यांनी दिला आहे.
खराब हवामानामुळे फडणवीस-शिंदेंचा जळगाव दौरा रद्द
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला पूर्वनियोजित जळगाव दौरा अचानक रद्द करावा लागला. खराब हवामानामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला सोमवार, दि. 30 जानेवारी रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाला वेळेत पोहचण्यासाठी त्यांच्या शासकीय विमानाने उड्डाणसुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले. यानंतर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून ते या कार्यक्रमाला हजर झाले.
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्यावतीने महाकुंभांचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने जळगावला पोहचणार होते. परंतु, हवामान खराब असल्याने हा जळगाव दौरा रद्द करावा लागला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑनलाईन माध्यमा’द्वारे या कुंभाला उपस्थिती दर्शवून उपस्थितांशी संवाद साधला
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.