मुंबई : "मुंबईमध्ये शिवसेनेचे एकच मिशन सुरु आहे फोडा झोडा मराठी माणसाला गाडा, आणि आपला मॉल चालवा" अशा शब्दांत भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तिखट टीका केली. सामान्य मुंबईकर मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केले? त्यांच्या हक्काची घरे, त्यांच्या हक्काच्या सर्व वस्तू यांनीच हिसकावून घेतल्या आणि सामान्य मुंबईकर मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले आहे. मराठी माणसाचा १०० टक्के विश्वासघात शिवसेनेने केला आहे. ही तीच शिवसेना आहे जी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सैनिकांवर गोळ्या चालवणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसली होती असाही आरोप शेलार यांनी केला.
पालिकेच्या शाळा कोणी बंद केल्या? गिरणगावातील गिरण्या बंद करून मराठी माणसाला रस्त्यावर कोणी आणले? बिल्डर लोकांचा फायदा करून देऊन मराठी माणसांना वडापाव विकण्याची वेळ कोणी आणली? मराठी माणसाला रस्त्यावर आणून शिवसेनेने फक्त कमिशन धंदा केला असे घणाघाती आरोप आशिष शेलारांनी केले आहेत. या सगळ्या कमिशनराजला कंटाळून सगळे कर्तबगार नेते सोडून गेले, वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. हे सर्व अनर्थ फक्त एका अहंकारामुळेच झाले, अशी आरोपांची फैरीच शेलारांनी झाडली आहे.
तरीसुद्धा पेंग्विनसेना ही मराठी माणसांचे नाव लावून दुसर्यावरच खापर फोडत आहे, आपले अपयश झाकण्यासाठी मराठी कविता लावताय. फक्त भगव्याला बदनाम केले जातेय फक्त फक्त स्वतःचे अपयश झाकण्यासाठीच हे सर्व चालू आहे, हा खेळ आता फार दिवस चालणार नाही असा इशाराच शेलार यांनी आपल्या या ट्विटद्वारे दिला आहे.