शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती धार्मिक मंत्रोच्चारात समाधिस्त!
12-Sep-2022
Total Views | 126
55
भोपाळ: ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि द्वारकेतील शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी नरसिंहपूर येथे वैदिक मंत्रोच्चारात समाधिस्त करण्यात आले. रविवारी झोतेश्वर येथील परमहंस गंगा आश्रमात वयाच्या ९८व्या वर्षी स्वरूपानंदांनी अखेरचा श्वास घेतला. वैदिक मंत्रोच्चारात, भजन -कीर्तन करत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तगणांच्या साक्षीने समाधी सोहळा पार पडला. त्यांना समाधिस्त करण्याआधी प्रथेप्रमाणे त्यांचे उत्तराधिकारी घोषित करण्यात आले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
इसवी सन आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी चारधाम म्हणून पवित्र मानल्या गेलेल्या तीर्थस्थळांच्या स्थानी शंकराचार्यांची पीठे स्थापन केली होती. त्या मठांच्या मठाधीशांना शंकराचार्य संबोधतात. बद्रीनाथ, द्वारका, शृंगेरी, जगन्नाथपुरी येथे ती पीठे आहेत. मी,मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावी स्वरुपानंदांचा जन्म झाला. त्यांनी स्वामी करपात्री महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. स्वरूपानंदांनी स्वातंत्र्यसंग्रामातही भाग घेतला होता व कारावासाची शिक्षाही भोगली होती. १९८१ साली त्यांना शंकराचार्य हे उपाधी मिळाली.
स्वरूपानंदांना समाधिस्त करताना एका खोल खड्यात त्यांच्यासाठी आसन तयार केले गेले होते. सुवासिक फुलांनी ती आसनाची जागा सुशोभित करण्यात आली होती. स्वरूपानंदांच्या पार्थिवाला मंत्रोच्चारात स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. समाधीस्थानी बसवल्यावर त्यांची आरती करण्यात आली मग त्यांच्या देहाभोवती मीठ आणि कापूर घालून त्यांच्या देहाला समाधिस्त करण्यात आले.