नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता ज्याने आपल्या विनोदबुद्धीने, ओघवत्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे अशा राजु श्रीवास्तवच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला आहे. त्यामुळे त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजु श्रीवास्तव हा ट्रेडमिलवर धावत असताना त्याला अचानक चक्कर आले आणि तो बेशुद्ध पडला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राजु श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकार म्हणूनच नाही तर उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचा अध्यक्ष म्हणूनही त्याची वेगळी ओळख आहे.
गेली पंधरा-सोळा वर्षे तो मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेज'मधून राजुला मोठं व्यासपीठ मिळालं. त्यानंतर त्याला चित्रपटही मिळत गेलेत. त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना जिंकुन घेतलं होतं. याशिवाय बॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपट महोत्सव, अॅवॉर्ड शोमध्ये राजुचा सहभाग आवर्जुन असायचा. काही वेळा तर त्याने आपल्या अतिउत्साही स्वभावामुळे अनेक सेलिब्रेटींचा रोषही पत्करला होता.
राजु श्रीवास्तवला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी तसेच बॉलीवूड मधील त्याच्या मित्रवर्गाने काळजी व्यक्त केली आहे. तूर्तास नेहमीप्रमाणे त्याच्या ट्रेडमिलवर धावत असताना राजूला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला, एवढीच प्राथमिक माहिती समोर आली आहे.