मुंबई : पुढच्या अडीच वर्षांसाठी विधानसभेचे विरोधीपक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली आहे. आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून अजित पवार काम करतील. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जास्त असल्याने साहजिकच त्या पक्षाचे नेते अजित पवार यांचीच विरोधीपक्षनेते म्हणून निवड होणे अपेक्षित होते.
सुमारे १५ वर्षांचा सत्तेत राहण्याचा अनुभव असलेल्या अजित पवारांची विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आता पर्यंत ४ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान अजित पवार यांना मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही पदे अजित पवारांनी भूषवली होती. अनेक वर्षे प्रशासन चालवण्याचा अनुभव, त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची अभ्यासूवृत्ती या सर्व गोष्टींचा राज्याला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.