प्रवास करणे म्हणा सगळ्यांच्याच आवडीचे. पण, प्रवास म्हणजे फक्त मजामस्ती, फिरायला जाणे, धांगडधिंगा घालणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते का? स्वतःला ओळखून, स्वतःच्या अंतर्आत्म्याला प्रतिसाद देऊन, स्वतःला विकसित करण्याचा प्रवास हाही तितकाच महत्त्वाचा असतो, हे फार कमीजण ओळखतात. पण, हाच प्रवास खूप महत्त्वाचा असतो. कारण, तो स्वतःला विकसित करण्यासाठी असतो. याच प्रवासामुळे आपल्याला आपली स्वतःची ओळख मिळते आणि याच ओळखीतून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. हाच प्रवास उलगडून दाखवून त्याचे महत्त्व, त्याचे परिणाम, या सर्व गोष्टींना एक व्यावसायिक स्पर्श देणार्या ‘माय हॉलिडे’च्या आशिष घाटे यांचा उद्योजकीय प्रवास असाच विलक्षण आहे...
आशिष घाटे प्रारंभी ‘आयटी’ क्षेत्रात कार्यरत होते. 15 वर्षांहून अधिक काळ त्यांना या क्षेत्रात कामाचा प्रदीर्घ अनुभव. पण, हे काम म्हणजे रटाळ आणि एकसुरी. सकाळी ऑफीसला जायचे, पण परतीची वेळ काही निश्चित नाही. ‘टार्गेट्स’ पूर्ण करा, धावपळ करून कामं करा, यातच सगळा वेळ जायचा. स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनिवडी, ‘पॅशन’ यासाठी वेळ देणे हे निव्वळ अशक्यच. पण, मग यातून स्वतःला कधी वेळ देणार? स्वतःची प्रगती कशी साधणार? यांसारखे प्रश्न आशिष यांना कायमच सतावत असत. आशिष जरी ‘आयटी’ क्षेत्रात कार्यरत असले, तरी ते सल्लागार म्हणूनही काम करत. फक्त सल्लागार म्हणून नाही तर प्रशिक्षण, समुपदेशन यांसारख्या क्षेत्रातही आशिष सक्रीय होते. याच ‘स्व’च्या शोध घेण्याच्या अस्वस्थेतून त्यांनी नोकरी सोडून सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली.
सल्लागार म्हणून अनेक छोट्या-मोठ्या ‘स्टार्टअप्स’, उद्योगांना मनुष्यबळ विकासासाठी, व्यवस्थापनाचे सल्ले देण्याचे काम आशिष करत होते. याच कामांच्या निमित्ताने अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येत असे. त्यांचा संपर्क एका ‘ट्रॅव्हल’ कंपनीशी आला. इथे आशिष यांच्या विचारांची दिशाच बदलली. त्यांना हवा असलेला मार्ग त्यांना गवसला. हाच आपला व्यवसाय असावा, असे त्यांनी ठरवले. याआधी आशिष यांनी फारसा प्रवास कधीच केला नव्हता. साधे पुण्याबाहेरही त्यांचे जास्त येणे-जाणे झाले नव्हते. पण, आता व्यवसायाच्या निमित्ताने भारतभ्रमण करण्याची संधी त्यांना मिळाली.
याच प्रवासात स्वतःला ओळखण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली, असे आशिष सांगतात. आपल्यामध्ये कसे बदल घडतात, त्यामुळे आपल्याला काय फायदे-तोटे होतात, या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवता आल्या. स्वतः या संपूर्ण प्रवासात आपल्या सर्व गोष्टींना जवळून अनुभवता आल्यामुळे हाच अनुभव इतरांनाही देता आला पाहिजे, इतरांनीही स्वतः घडत जाण्याच्या प्रवासाचा अनुभव घेतला पाहिजे, याच जाणिवेतून आशिष यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि तो पर्यटनाशीच निगडित असावा, असेच त्यांनी ठरवले.
पर्यटन व्यवसाय म्हटले की, ते ‘बुकिंग’ साठी झटणारे लोक, ‘टुरिस्ट गाईड्स’, त्या ‘ट्रॅव्हल’ कंपन्यांच्या बसेस असेच सर्वसाधारण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण, आशिष यांना या नेहमीच्या पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते आणि स्वतःचा वेगळा ‘टच’ या व्यवसायाला द्यायचा होता. त्यामुळे फक्त या व्यवसायाशी निगडित न राहता माणसांमधील नात्यांच्या प्रवासाला महत्त्व देण्यास त्यांनी सुरुवात केली. आपण कायम आपल्याला वेळ मिळत नाही, असे म्हणत राहतो. पण, आपल्याला एका वर्षात सर्व सुट्ट्या मिळून किमान 100 दिवस तरी सुट्ट्या असतात. त्या सुट्ट्यांचा उपयोग आपण आपल्यासाठी न करता कायमच कुठेतरी फिरायला जाण्यात, मजा-मस्ती करण्यात घालवतो. पण, जर आपण हेच सुट्ट्यांचे दिवस आपल्या स्वतःसाठी दिले आणि स्वतःच्या शोधासाठी सत्कारणी लावले, तर आपल्या जीवनात खूप बदल घडू शकतो. हाच विचार करून ‘माय हॉलिडे’ ही संकल्पना समोर आली.
‘हॉलिडे’ मग कुठल्याही स्वरूपात असो, अगदी आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून एके ठिकाणी एकांतात बसणे आणि स्वतःचा विचार करणे हाही आपला ‘हॉलिडे’ असू शकतो. घरच्यांना बरोबर घेऊन कुठेतरी मनमोकळे बोलण्यासाठी जाणे, कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांबद्दल असलेल्या भावना व्यक्त करणे, एकमेकांना समजून घेणे हाही एक प्रकारचा ‘हॉलिडे’ असू शकतो. इतक्या साध्या, पण कोणालाही आवडू शकेल, अशा संकल्पनेवर ही कंपनी काम करते. आपण या गोष्टी कशा ‘प्लान’ करू शकतो आणि आपल्या ‘त्या’ खास क्षणांचा कसा आनंद घेऊ शकतो, हेच यातून आपल्याला साध्य करायचे आहे, असे आशिष सांगतात आणि हेच आशिष यांच्या ‘माय हॉलिडे’चे वैशिष्ट्य...
आशिष यांना आपल्या या प्रवासात अनेक सुंदर अनुभव आले. त्यांच्या मित्राचीच एक आठवण आहे. त्यांच्या मित्राचे म्हातारे आईवडील एकटेच राहतात. मुलगा कायम त्याच्या कामामध्ये व्यस्त. त्यामुळे त्याला घरच्यांसाठी अजिबात वेळ नाही. कधीतरी सहा-सात महिन्यांनी भेट होते आणि तेव्हाच काही झाले तर बोलणे, एवढाच काय तो एकमेकांचा संपर्क. ते मित्राचे आईवडील एक दिवस आशिष यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “बरेच महिने झाले मुलाशी धड बोलणेही झालेले नाही, मनमोकळेपणाने बोलण्यासाठी काही वेळच नाही. त्याला घेऊन एखाद्या ठिकाणी एकत्र जाता येईल, अशी ट्रीप आम्हाला तयार करून देतोस का?” आशिष यांनी त्यांच्या त्या मित्राशी संपर्क साधून वेळ, ठिकाण ठरवले आणि त्या तिघांनी तिकडे जाऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या.
स्वतःच्या मनातल्या गोष्टी ’शेअर’ केल्या आणि परत आल्यावर आवर्जून आशिष यांना सांगितले की, “आता पुढच्या सहा-सात महिन्यांची एनर्जी घेऊन आलो आहोत.” अजून एक अनुभव हा एका जोडप्याचा आहे. त्यांचे लग्न होणार होते. त्यांच्या हनिमूनसाठी ‘प्लानिंग’ करायला तो मुलगा आला होता. त्याने आपल्या बायकोला ‘सरप्राईज’ म्हणून मस्त एका बीचची निवासव्यवस्था केली होती. सगळे व्यवस्थित ’अरेंज’ केले होते. पण, जेव्हा त्याच्या बायकोशी याबाबत बोलणे झाले, तेव्हा त्याला कळले की, तिला पाणी असलेले ठिकाण मुळी आवडतच नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते दोघे त्यांच्या साखरपुड्यानंतर आशिष यांच्यासमोरच इतका वेळ बोलले होते. संवाद किती महत्त्वाचा आहे, हेच यातून दिसते. आपण एकमेकांशी बोलायला, समजून घ्यायला किती विसरतो की नाही.... पण, अशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण काम करतो आहोत, यांचे खूप समाधान असल्याचे आशिष आवर्जून नमूद करतात.
आपल्याकडे कुठल्याही व्यवसायाचे मोजमाप करताना, त्या उद्योजकाने किती पैसे मिळवले, यावर त्याच्या यशाचे मोजमाप केले जाते. किती कोटींचा नफा तो मिळवू शकला, किती कोटींची उलाढाल आहे, हीच काय ती यशाची मोजपट्टी. पण, यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे, त्याने एखादी नवीन संकल्पना आणली आहे आणि त्यातून उद्योग उभा करण्याची हिंमत दाखवली आहे आणि या गोष्टीचे कौतुक होणे गरजेचे आहे. कारण, स्वतः पुढे येऊन तो काहीतरी नवीन करून दाखवत आहे आणि हे दाखवत असताना त्याने ज्या गोष्टींचा सामना केला आहे, कोणत्या परिस्थितीतून तो हे सगळे उभारतो आहे, याचा सन्मान होणे गरजेचे आहे. कायम यश हे जे दिसते त्यावरच न मानता त्याने केलेल्या प्रवासावरसुद्धा अवलंबून असते, हे समजून घेणे गरजेचे आहे आणि हे प्रोत्साहनपर अशा पद्धतीने मिळत राहिले, तरच त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल आणि असे काहीतरी नवीन करू शकणारे लोक पुढे येतील.
पर्यटन व्यवसायाने गेल्या दोन वर्षांत खूप आव्हानांचा सामना केला आहे. काहीच चालू होत नव्हते, अशा काळात कित्येक जणांनी आपले व्यवसाय बदलले. आपल्या हातात असलेली मालमत्ता विकून घेतलेली कर्जे फेडून टाकली. काहींनी तर आता पुढची काही वर्षे तरी या व्यवसायाकडे फिरकायचे नाही, असे ठरवले, अशा भरपूर गोष्टी झाल्या आहेत, पण आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. लोक मोठ्या प्रमाणात फिरायला बाहेर पडत आहेत, त्यातून थोड्या फार समस्या उभ्या राहत असल्यातरी आता व्यवसाय पूर्वपदावर येते आहे. हे खूप चांगले चिन्ह असल्याचे आशिष सांगतात.
प्रवास या गोष्टीला नवीन आयाम देऊन त्याचे व्यवसायाशी नाते जोडणारा आशिष यांचा हा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.