मुंबई (शेफाली ढवण) : मागील महिन्यात कुर्ला येथील इमारत दुर्घटना ताजीच आहे. या दुर्घटनेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले. परंतु, या घटनेनंतरही मुंबई महापालिकेला जाग आल्याचे दिसत नाही. बोरिवलीतील श्रीकृष्ण नगरमधील सहकार इमारतीच्या झालेल्या दुरवस्थेकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचेच दिसून येत आहे. तसेच, अनेकदा लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्याचेही स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना स्पष्ट केले.
लेखी स्वरूपात प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, दहिसर पोलीस स्थानकांतही तक्रारी आम्ही केलेल्या आहेत. आमच्याच घरात आम्ही जीव मुठीत घेऊन राहत आहोत. तळमजल्यालाच आमचे घर असल्यामुळे मलनिस्सारण वाहिनीचाही प्रचंड दुर्गंध आमच्याकडे येत असतो. इमारत दुर्घटनांच्या बातम्या आम्ही जेव्हा बघतो आणि ऐकतो, तेव्हा भीती वाटते. पण आम्ही तरी काय करणार, आम्हाला राहायला दुसरी जागा नसल्यामुळे येथेच राहावे लागत असल्याची भावना स्थानिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच, इमारतीचे काही अवशेष पडत असून इमारतींमध्ये पाण्याची गळतीसुद्धा सुरू आहे. घरात महिला आणि लहान मुलेच असतात. त्यामुळे सारखी धास्ती लागून राहिलेली असल्याचेच स्थानिकांनी म्हटले आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याची खंतही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मी २००४ मध्ये येथे आले. तेव्हापासून इमारतीचा पुनर्विकास व्हावा, म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे. इमारतीची इतकी दुरवस्था झाली आहे की, इमारतीचे काही अवशेषदेखील आता पडण्यास सुरुवात झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही इमारतीकडे लक्ष पुरवण्यात येत नसल्यामुळे आम्ही अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहोत, असे येथील स्थानिक चित्रा पाटील यांनी म्हटले आहे.