मुंबईच्या ‘लेट अस इमॅजिन टूगेदर’ या गेल्या चार वर्षांपासून समाजभावनेतून कार्यरत तरुणांच्या समूहाने दि. २५ जून रोजी वाडा तालुक्यातील तीन जिल्हा परिषदांच्या शाळांना भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांसह छत्री रंगवण्याची कार्यशाळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्याचेच केलेले हे अनुभवचित्रण...
यावेळी आम्ही खास तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत?” या ओंकारच्या प्रश्नावर बालिवली शाळेतील सर्व मुलांनी एकसाथ उत्तर दिले... “छत्री!”
“हो, पण फक्त छत्री देणार नाही, तर काय करणार आहोत, तर छत्री रंगवणार आहोत.” ओंकार आणि मुलांमध्ये नेहमीप्रमाणे संवाद सुरू होता. बालिवली शाळेतील सर्व मुले छत्रीच्या गठ्ठ्याकडे उत्सुकतेने पाहत होती.
जून-जुलै महिना म्हटलं की, शाळाही सुरू झालेल्या असतात आणि पावसाचीसुद्धा ‘बॅटिंग’ चालूच असते. म्हणून शैक्षणिक साहित्य तर द्यायचे, पण यावेळी त्याचबरोबर छत्रीही द्यायची, असं पक्कं केलं होतं. पण, मग छत्री रंगविण्याची कार्यशाळाही घेऊया, असा विचार मनात आला आणि त्याप्रमाणे नियोजन केले. बालिवली शाळेस आधी भेट द्यायची होती, म्हणून ठरवल्याप्रमाणे आम्ही शाळेत हजर होतो आणि मुले तर उत्सुकतेने आमची वाट पाहत होती. प्रल्हाद सरांशी सकाळी बोलणे झाले होते.
मुलांच्या चेहर्यावर आनंद, उत्सुकता, कुतूहल सर्वच भाव एकवटले होते. नेहमीप्रमाणे आधी मुलांशी गप्पा करण्यास ओंकारने सुरुवात केली होती. पावसाळा म्हटलं, तर काय काय बदल अनुभवायला येतात, यावर मुलांनी खूप छान-छान उत्तरे दिली. कधीही न ऐकलेल्या रानभाज्यांची नावे त्यावेळी कळली. वेगळ्या प्रकारच्या कागदी होड्याही मुलांनी अगदी उत्साहाने बनवून दाखविल्या. मग ज्या क्षणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते, ती छत्री त्यांना देण्यात आली. आता ती रंगवायची म्हणजे नक्की काय करायचे, ते आमच्या सोबत आलेल्या आकाशदादाने त्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. मग काय विचारता, सगळे आपापली छत्री आणि रंग घेऊन त्यात असे काही मग्न झाले की विचारायची सोयच नाही!
११ वाजत आले होते. बालिवली शाळेतील मुले पहिल्यांदाच छत्री रंगविण्याचा अनुभव घेत होते. त्या सगळ्यांबरोबर त्यांनी रंगविलेल्या छत्रीसोबत एक छानसा फोटो काढून आम्ही पुढे मोज शाळेसाठी निघालो.
मोज शाळेत तर मुलांना किशोर सरांनी आठवडाभर आधीच आम्ही येणार असल्याचे सांगून ठेवले होते. त्यामुळे मुलांना आपण काय करणार आहोत, याची कल्पना होती. पण, छत्री रंगवायची म्हणजे नक्की काय, हे माहीत नव्हतं. मुलांशी गप्पा सुरू झाल्या. आमच्या बरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली. सगळ्यांनीच गप्पांमध्ये भाग घेतला. पावसाळा म्हणजे नक्की काय काय बदल - तर नदीला पूर येतो, रानभाज्या खाता येतात. पण, पावसाळ्यात मिळणारे मासे आणि चिंबोरी खायला जास्त मजा येते, असेही मुलांनी सांगितले. त्यात एका मुलाने पावसाळ्यातील महत्त्वाचा बदल सांगितला. तो म्हणजे - ताप येतो. गप्पा संपता संपत नव्हत्या. आता सगळ्या मुलांचे लक्ष छत्री कधी मिळतेय, याकडे होते. छत्री हातात आल्यावर जो काही चेहर्यावर आनंद दिसून येत होता, तो कॅमेर्यामध्ये बंदिस्त करणे शक्यच नव्हते. आम्ही सगळे ते डोळे भरून पाहत होतो. मोज शाळेतील मुले तशी ‘क्रिएटिव्ह’ आहेतच.
कुणी छत्रीवर पाऊस आणला, कुणी झाड, फूल, पाने, तर कुणी ‘वारली पेंटिंग.’ प्रांजलीने तर छत्री छानच रंगवली. ती उत्तम कविताही करते. तिची कल्पकता रंगांमध्येही दिसून आली. या शाळांमध्ये आजपर्यंत छत्री कोणी भेट दिली नव्हती, तर छत्री रंगविणे हा अनुभव दूरच! या दोन्हीचा मुलांनी मनापासून पुरेपूर आनंद लुटला. आपल्या छत्रीवर काय साकारू आणि काय नको, असे मुलांना झाले होते. कुणाच्या छत्रीवर आकाशगंगेतील चंद्रतारे अवतरले होते, तर कुणाच्या छत्रीवर फुलबागच डोलत होती. कुणी पावसाचे थेंबच साठवले होते, तर कोणी भारतमातेला वंदन केले होते. मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीला साकारायला पहिल्यांदाच एवढा मोठा छत्रीरुपी ‘कॅनव्हास’ मिळाला होता. आतापर्यंत चित्रकलेच्या वहीतील पानांवर चित्र आणि रंग रेखाटले जायचे, आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ‘कॅनव्हास’वर ‘पेंटिंग’ करताना काय काय रेखाटू आणि किती असे मुलांना झाले होते.
मोज आणि बालिवली शाळेतील छत्री रंगोत्सव पूर्ण करून आम्ही पोहोचलो शर्मिलाताईंच्या तुसे शाळेत. शनिवार असल्यामुळे शाळा खरेतर अर्धा दिवस. परंतु, ओंकारदादा आणि त्यांची मित्रमंडळी येणार आहेत म्हटल्यावर २.३० वाजता शाळा पुन्हा भरली. अगदी एकूण एक मुले शाळेत परत हजर होती. आज ही सगळी मंडळी आपल्यासाठी केवळ वह्या-पुस्तके नाही, तर छत्रीसुद्धा घेऊन आले आहेत, याचा आनंद मुलांच्या चेहर्यावर दिसत होता. नेहमीप्रमाणे गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. या शाळेतील मुले म्हणजे खळखळता उत्साहाचा झराच! शर्मिलाताई जशा सतत हसतमुख आणि उत्साही असतात तशीच त्याची मुलेसुद्धा. या शाळेतील बहुतेक मुले ही कातकरी समाजातली. बाहेरील जगाशी तसा जवळजवळ संबंधच नाही. अशा मुलांना छत्री रंगविण्याची कार्यशाळा आणि ती कशी रंगवायची, हे समजावून सांगणे थोडे कठीणच होते. ओंकारदादांशी या सर्व मुलांची खास गट्टी जमली आहे. त्याने एखाद्या सोप्या भाषेत त्यांना सहज कळेल, अशा प्रकारे समजावून सांगितले. “आपल्या घरासमोर अंगण असते की नाही, मग ते आपण सर्व रंगवतो, त्यावर छान रांगोळी काढतो. फुलांचेही झाड असते. अजून काय काय असते आपल्या अंगणात. तसेच ही छत्री म्हणजे आपले अंगण आहे, असे समजा आणि आता ती छान छान चित्र काढून रंगवा.” या शाळेतील मुलांनी तर कमालच केली. आपले भावविश्वच रंगाच्या मदतीने छत्रीवर साकारले. कुणी झाडं, कुणी पक्षी, तर कुणी छान रांगोळी काढली. हृतिकने छत्रीवर ‘आरआर’ तर दर्शनने छत्रीवर ‘डीडी’ असं मोठ्या अक्षरांत फिल्मी स्टाईलने लिहून पावसाचे थेंब काढलेत. पहिलीतील रुक्मिणी तर ऐटीत आपली छत्री घेऊन सगळीकडे मिरवत होती. संचितने अगदी नीटनेटकी आपली छत्री रंगवली होती.
यात सगळ्यात वेगळा होता तो प्रिन्स! छत्रीच्या काळ्या कापडावर त्याने काळ्या रंगानेच चित्र काढले होते. त्याला दुसरा रंग देऊ केला तर त्याचे एकच पालुपद, मी काळ्या रंगानेच रंगवणार. त्याच्या कल्पनाशक्तीने त्याने छत्री रंगवली आणि आणूनही दाखवली - “बघा मी कशी रंगवली!” त्याच्या या आत्मविश्वासाला दादच द्यायला हवी. सर्वांच्या छत्र्या रंगवून झाल्या होत्या. पावसाने थेंबाचा शिडकावा करून त्यांच्या कलर पॅलेटमध्ये हजेरी लावली होती.
’‘...या मुलांना तुम्ही काय आनंद दिला आहेत तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. या मुलांशी कोणी बोलायलाही मागत नाही, तिथे तुम्ही त्यांना जवळ घेता, त्यांच्याशी बोलता. आज तर सगळी मुले आपापली छत्री रंगवून काय खूश झाली आहेत, म्हणून सांगू. यांचा आनंद जर मोजता आला असता तर ओंकारदादा तुमचे पारडे नक्कीच जड झाले असते...” शर्मिलाताई बोलत होत्या. आम्हाला सर्वांना ही कार्यशाळा चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे समाधान होते आणि मुले...ती तर आपली छत्री उघडझाप करत, गरगर फिरवत, पाऊस कधी पडतोय आणि आपण रंगवलेली छत्री घेऊन गर गर फिरवत पावसात मिरवतोय, असे झाले होते. या वेळी पावसालाही खूप आनंद होईल, थेंबाथेंबाने येत छत्रीवरून ओघळत पाऊसही रंगीला होऊन जाईल.