मुंबई : "आदित्य ठाकरे स्वतःच एक लहान मूल असल्याने त्यांना बालहक्क आयोग नोटीस कशी काय पाठवू शकतो ?" असा औपरोधिक सवाल विचारत भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. अशा नोटिसी पाठवून बच्चेकी जान लोगे क्या ? असाही सवाल नितेश राणेंनी आपल्या ट्विट मधून विचारला आहे. आरे आंदोलनावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
आरे मध्ये मुंबई मेट्रो ३ चे कारशेड उभारण्याला विरोध करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी आरे वाचवा असे आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी लहान मुलांना सहभागी करून घेऊन बालहक्क कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका आदित्य यांच्यावर ठेवत त्यांना बालहक्क आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यानंतरच्या पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या आरे कारशेड रद्द करण्याचा निर्णय फिरवत कारशेड आरेमध्येच होणार असे जाहीर केले होते. त्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आंदोलनाचे राजकारण खेळले जात आहे.