पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी बैलघाट मार्गे ट्रेकिंगसाठी बाहेर पडलेले सहा युवक मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने या सहा जणांना घोडेगाव पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवून रविवारी रात्री सुखरूप बाहेर काढले.
पवन अरुण प्रतापसिंग, सर्वेश श्रीनिवास जाधव, निरज राजाराम जाधव, दिनेश धर्मराज यादव, अंकुश सत्यप्रकाश तिवारी आणि हितजेश श्रीनिवास हे सर्व युवक गुगल मॅप चा आधार घेत भीमाशंकरकडे निघाले होते मात्र ते रस्ता चुकले आणि दाट जंगलात भरकटले. मुंबई, उल्हासनगर येथील हे सहा युवक ट्रेकिंगसाठी बैलघाट तसेच, शिडी मार्गे भीमाशंकर मार्गावर निघाले होते मात्र, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने आणि धुक्याने रस्ता चुकला. पुढील रस्ता दिसनेसा झाल्याने त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. तत्काळ त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या सर्वांना प्राथमिक उपचार आणि राहण्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली. पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन माने व इतर कर्मचारी यांनी ही मोहिम राबवली. त्यांना भीमाशंकर गावचे पोलिस मित्र सागर मोरमारे, सूरज बुरुड यांनी मदत कार्यात सहकार्य केले.