पुणे : विजेच्या उच्चदाब वाहिनीवर अडकलेल्या अजगराला स्थानिक अग्निशमन जवान आणि सर्पमित्रांनी केलेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर जीवदान देण्यात यश आले. या अजगरास नंतर सुखरुपरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
येथील महिंद्रा सॅनियो (मस्को) कंपनीती शुक्रवारी चार तास हे थरारक रेस्क्यु ऑपरेशन सुरु होते. कंपनीच्या पॉवर स्टेशनच्या आवारात १ लाख व्होल्टेज (शंभर केव्ही) चे टॉवर आहे. त्यावर अजगर जातीचा १० फूट लांबीचा साप चढताना कामगारांना दिसला. तो खाली उतरले, असे त्या कामगारांना वाटले. बराच वेळानंतर तो खाली न आल्याने कर्मचारी नागेश गडदे यांनी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर आणि सुनील पुरी यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांनी सर्पमित्र अमोल ठकेकर आणि दिनेश ओसवाल यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या टॉवरजवळून १ लाख व्होल्टेजची हाय टेन्शन वाहिनी जात होती त्यामुळे धोका अधिक होता.
ते पॉवर स्टेशन काही वेळासाठी बंद केले. खोपोली नगरपालिकेचे फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी हे जवानांना घेवून तेथे दाखल झाले. वेगवेगळे प्रयत्न केल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्याचे ठरवले. सुनील पुरी, दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, गुरुनाथ साठेलकर या सर्पमित्रांच्या मदतीला नवीन मोरे, अमोल कदम, शुभम कंगळे, सोनू पवार यांच्यासह खोपोली अग्निशमन दलाचे प्रमुख हरी सुर्यवंशी, मोहन मोरे यांनी पाण्याचा मारा करण्याचे ठरवले. टॉवरवर खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉटर गनने पाणी मारले. टॉवरच्या खाली सर्व मित्रांनी त्या अजगराला झेलण्याची तयारी केली होती. काही वेळातच पाण्याच्या दाबाने साप त्या टॉवरवर निसटून खाली कोसळला. खाली त्या क्षणाची आशंका असणार्या सर्वांनी त्या अजगराला अलगद झेलले आणि सुरक्षित पकडले. सरपटणार्या प्राण्यांमधील ए ग्रेडचा समजला जाणारा अजगर जातीचा साप सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी मस्को कंपनीचे अधिकारी राकेश रोशन, संतोष मडीवळेकर, अभिजीत कोथावडेकर आणि सुरक्षा कर्मचार्यानी सहकार्य केले.