हम्पीच्या विजयनगर साम्राज्याचा समृद्ध वारसा उलगडणारे पुस्तक

    25-Jun-2022
Total Views | 336
news 1



हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आपल्यापैकी बरेचजण तिथे प्रत्यक्षात भेट देऊन आले असतीलच. आज तेथील 40 ते 50 किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना आपलं मन उद्विग्न होतं आणि मध्यंतरी याच विषयावर अ‍ॅड. सुशील अत्रे यांचे ‘हम्पी - विजयनगर’ हे पुस्तक वाचनात आले. विजयनगर साम्राज्याविषयी फारच मर्यादित माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यात मराठीत असलेली पुस्तके म्हणजे बोटावर मोजावी इतकीच.


 
 
विजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इसवी सन 1336 ते 1565 काळातील बलाढ्य हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इसवी सन 1503 ते 1530 हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पाइश हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिले. आज त्यांची रोजनिशी विविध भाषांत उपलब्ध असून त्यातील वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम श्रीमंत शहर, अशी त्याची ख्याती अगदी इराक-इराणपर्यंत होती.’
 
 
मुळात विजयनगर ही सुवर्णनगरीच होती. पण इसवी सन 1560 नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इसवी सन 1565 तालिकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुर्‍हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने हे संपूर्ण शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते, ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते आणि आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.
 
 
 
लेखक सुशील अत्रे पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, “आपण इतिहास घडवत नसतो, तर इतिहास आपल्याला घडवतो, असे मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता. जे इतिहासाकडून काहीच शिकत नाहीत, त्यांच्या नशिबात इतिहासातील दुर्दैवाची पुनरुक्ती येते. एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपल्याला स्वतःला घडवायचे असेल, तर इतिहासासारखा दुसरा गुरू नाही. पण, त्यासाठी या इतिहासाकडे मोकळेपणाने, तटस्थपणे बघणे आवश्यक आहे. आपल्याच इतिहासाबद्दल पूर्वग्रहदूषित असणे यासारखा मूर्खपणा दुसरा नाही. आपल्या देशाच्या इतिहासाविषयी अस्थानी गर्व बाळगणे चुकीचे आहेच, पण त्यापेक्षाही आपल्या इतिहासाविषयी अस्थानी द्वेष बाळगणे अधिक चुकीचे आहे.” अगदी सुरुवातीला मनोगतात मांडलेला हा विचार सद्यःस्थितीत तंतोतंत पटणारा आहे.
 
 
 
‘हम्पी-विजयनगर’ या पुस्तकाची सुरुवात किष्किंधेपासून-रामायण काळापासून अत्रे यांनी केली आहे. चौदाव्या शतकातील विजयनगर साम्राज्याचा उदयास्त व त्या साम्राज्याचे विविध पैलू यांचा साद्यंत आणि साधार इतिहास आणि हम्पी या विश्ववारसा स्थळाची पर्यटनासाठी उपयुक्त माहिती आणि छायाचित्रे असे सगळे विषय त्यांनी या पुस्तकात एकत्र केले आहेत. आजचे ‘हम्पी’ किंवा त्या काळातील ‘विजयनगर’, हे दोन्ही जसे त्यांना दिसले, तसे त्यांनी संदर्भ मांडले आहे. हे वर्णन कुठेतरी स्वनिष्ठ, सापेक्ष होणारच होते. पण, ते पक्षपाती होऊ नये, याची त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. विशेषतः इतिहास नमूद करताना त्याचे संदर्भ त्यांनी शक्य तेवढे तपासून घेतले आहेत. तरीही ते संदर्भ परिपूर्ण नाहीत, याची त्यांना जाणीव आहे आणि ते पुस्तकात नमूदही करतात की, पुस्तक वाचून एखाद्याला आणखी संदर्भ शोधावेसे वाटले, तर आनंदच वाटेल.
 
 

अ‍ॅड. सुशील अत्रे 2012 मध्ये पहिल्यांदा ‘हम्पी’ला गेले. गेल्यावर साहजिकच छायाचित्रे घेतल्यावर त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. नंतर बर्‍यापैकी ’होमवर्क’ झाल्यावर 2021 मध्ये ते पुन्हा एकदा हम्पीला गेले आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. पुस्तकाला डेक्कन महाविद्यालयाचे कुलपती विद्यानिधी अरविंद जामखेडकर सरांची प्रदीर्घ पण अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी प्रस्तावना लाभली आहे, त्यावरूनच आपण पुस्तकाची उंची अनुभवू शकतो.

 
 
आज आपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत, ज्यांचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. तसेच, ती स्थळे नितांत सुंदर सौंदर्याने नटलेली आहेत. पण, दुर्दैवाने आपल्याकडे या स्थळांचे जतन झाले नाही आणि त्यावर अभ्यासपूर्ण आणि माहितीपर लेखनही झाले नाही. आता तरी आपण यातून धडा घेऊन ही स्थळे पुनरुज्जीवित केली पाहिजेत, त्यांचे संवर्धन केले पाहिजे, तेव्हाच संपूर्ण जगात आणि आपल्याच देशातील पुढच्या पिढीपर्यंत आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा पोहोचेल आणि अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी ‘हम्पी-विजयनगर’ या पुस्तकाची निर्मिती करत याची सुरुवात केली आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. उत्तम मुखपृष्ठ आणि बांधणीमुळे पुस्तक आकर्षक तर झाले आहेच, पण प्रत्येकाच्या संग्रही असावे आणि वाचनीय पुस्तक म्हणजेच ‘हम्पी-विजयनगर’ आहे.
 
 

- सर्वेश फडणवीस 




पुस्तकाचे नाव : हम्पी- विजयनगर
लेखक : अ‍ॅड. सुशील अत्रे
प्रकाशक : इतिहासाच्या पाऊलखुणा बहु. संस्था -
पृष्ठसंख्या : 226
मूल्य : 300


पुस्तकासाठी संपर्क : 9860366388
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121