मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे. या घटनेसंबंधी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. राऊतांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये "राऊत यांची 'सुरत' बघण्यासारखी झाली आहे". असा टोमणा मारून पाटील यांनी राऊतांवर टीका केली.
एरव्ही मुलुखमैदानी तोफ असल्याप्रमाणे विरोधकांवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांनी शिंदेंच्या बंडावर नेहमीप्रमाणे आक्रमक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळेच राऊतांना सोशलमिडीयावर अनेकांकडून ट्रोल करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आमदार रवींद्र फाटक व शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांचे बंड शमणार कि महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार, अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.