नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील काबुल येथील गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सविंदर सिंग यांच्या ‘अंतिम प्रार्थने’चे आयोजन दिल्लीतील टिळक नगर येथील गुरुद्वारा गुरु अर्जुन देवजी येथे करण्यात आले होते. यादरम्यान केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्रही वाचून दाखवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिले की, अफगाण शीख समुदायाच्या प्रिय सदस्यांनो, १८ जून, २०२२ रोजी काबुल येथील गुरुद्वारा दशमेश पिता साहेब श्री गोविंद सिंग साहिब जी यांच्यावर झालेल्या रानटी हल्ल्याच्या विरोधात मी तुमच्या धैर्य आणि प्रतिकारशक्तीला सलाम करतो. धार्मिक स्थळावरील दहशतवादी हल्ला आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे हे मानवतेविरुद्धचे घृणास्पद कृत्य आहे.
मोदींनी पुढे लिहिले की, मी दहशतवादी हल्ल्यातील बळी, स्वर्गीय सविंदर सिंग आणि गुरुद्वाराचे कर्मचारी अहमद मोरादी (अफगाण नागरिक) यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रति मी मनापासून शोक व्यक्त करतो. दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या समुदायाच्या तीन सदस्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. दु:खाच्या आणि वेदनांच्या या कठीण क्षणी मला अफगाण हिंदू-शीख समुदायासोबत भारताची एकता व्यक्त करायची आहे.
सविंदर सिंग यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या : कुटुंबीय
सविंदर सिंग यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीत सांगितले की, जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते अंघोळ करत होते आणि त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. गुरुद्वारामध्ये अनेक स्फोट झाले, ज्यात एका शीख बांधवासह दोन लोक ठार झाले. त्याचवेळी अफगाण सुरक्षाजवानांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखून मोठी दुर्घटना टाळली. इस्लामिक स्टेटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून प्रेषित मोहम्मद यांच्या समर्थनार्थ हल्ला असे वर्णन केले आहे.