नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबराचा कथितरत्या अपमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी धर्मांधांनी शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, तेलंगणा, बेळगाव, महाराष्ट्रात गोंधळ माजवून हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिल्लीत गोंधळ माजविणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदावर कार्यरत असलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर त्यांनी कथितरित्या मोहंमद पैगंबर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्यासोबतच दिल्ली प्रदेश भाजपचे प्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, मुस्लिम समुदायाकडून प्रामुख्याने नुपूर शर्मा यांच्याविरोधात कथित ईशनिंदा केल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. शर्मा यांच्या विरोधात जुम्म्याच्या नमाज पठणानंतर दिल्ली येथील जामा मशीद ते जामिया मिलिया इस्लामियाच्या परिसरात निदर्शने झाली. दिल्लीतील जामा मशिद परिसरात नमाजपठणानंतर धर्मांधांचा झुंड अचानक रस्त्यावर उतरला, त्यांनी यावेळी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली होती.
त्याविषयी बोलताना मध्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्त श्वेता चौहान म्हणाल्या की, या लोकांनी जिंदल आणि शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याविरोधात आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी जवळपास ३०० जणांच्या झुंडीवर १० ते १५ मिनिटात नियंत्रण मिळविले. या लोकांनी विनापरवाना रस्त्यावर आंदोलन केले आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशातही तोडफोड, जाळपोळीचे सत्र
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्येही जुम्म्याच्या नमाजनंतर बाहेर पडलेल्या झुंडीने दगडफेक आणि जाळपोळ आणि गोळीबार केला आहे. पोलिसांनी झुंडीस रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. झुंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासोबतच अश्रूधुराचाही वापर करण्यात आला. यावेळी पोलिस महानिरीक्षकांसाह अनेक पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशात प्रयागराजसह राजधानी लखनऊ, सहारनपूर, मुरादाबाद, देवबंद, हाथरस, फिरोजाबाद आदी शहरांमध्ये धर्मांधांनी हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जाळपोळ, दुकानांची तोडफोड, दगडफेक आदी प्रकार घडविण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांना त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बेळगावमध्ये नुपूर शर्मा यांच्या पुतळ्यास फासावर लटकविले
कर्नाटकातील बेळगावी येथील फोर्ट रोड परिसरामध्ये बसहिसान दर्ग्याजवळ नुपूर शर्मा यांच्या पुतळ्यास फासावर लटकविण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये एका पुतळ्यास साडी नेसवून त्यावर शर्मा यांचे छायाचित्र चिटकविण्यात आले होते. हा प्रकार पोलिसांच्या ध्यानात येताच त्यांनी तो पुतळा ताबडतोब उतरविला आहे.
महाराष्ट्रातही धर्मांध रस्त्यावर
जुम्म्याच्या नमाजनंतर रस्त्यावर उतरण्याचे लोण महाराष्ट्रातही पसरले आहे. नुपूर शर्मा यांच्याविरोधात महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, औरंगबाद येथेही जुम्म्याच्या नमाजनंतर रस्त्यावर उतरून शर्मा यांचा विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगाणा येथेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विरोध करण्यात आला.
ते ओवेसींचे लोक असतील... – शाही इमामांचा दावा
दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम यांनी मशिद कमिटीतर्फे अशा कोणत्याही प्रकारच्या विरोध आंदोलनाची हाक देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, गुरुवारी काही लोक अशा प्रकारच्या विरोध आंदोलनाची आखणी करत होते. मात्र, जामा मशिद कमिटी अशा कोणत्याही प्रकारामध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. लोकांना विरोध करायचा असल्यास ते तसे करू शकतात, असे आम्ही स्पष्ट केले होते. त्यामुळे आजचा प्रकार कदाचित एआयएमआयएम अथवा ओवेसींच्या लोकांनी घडविला असावा, असा दावा त्यांनी केला आहे.