जाधव इन्कम टॅक्सनंतर आता ईडीच्या रडारवर

    25-May-2022
Total Views | 92

sanjay jadhav
 
 
 
 
मुंबई : शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत असून इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता ईडीचा ससेमीरा मागे लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडून यशवंत जाधव यांचे घर, मालमत्तावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स आल्याने यशवंत जाधव अडचणीत येताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०२२ पासून आयकर खात्यातर्फे चौकशी सत्राला सुरुवात झाल्यानंतर आता जाधव ईडीच्या रडारवर आले असून लवकरच त्यांची ईडीतर्फे चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
यशवंत जाधव यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता ३६ वरून ५३ वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता ५३ झाली आहे. यात 'कैसर बिल्डीं'गचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर खात्याने या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली.
 
 
 
बिलाकाडी चेंबर्समध्ये ३ खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी १.१५ कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे. तसेच कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी ३ कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे. एकूण संपत्तींची संख्या आता ३६ वरून ५३ वर पोहोचली आहे.
 
 
 
पाच कोटींच्या फ्लॅटसह ४० मालमत्तांवर टाच
 
यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या असून आयकर विभागाकडून या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅटचाही समावेश आहे. २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे.
 
 
 
यशवंत जाधव यांचे भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या फ्लॅट्सपैकी २६ फ्लॅट्स Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावावर आहेत. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केले होते. वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या १४ संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121