मुंबई : साल २००१ रोजी गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दिघेंची भेट घेतली होती. मात्र तेव्हाचे शिवसेना नेते आणि आजचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र दिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते. आताही त्याच उद्धव ठाकरेंनी धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातील आनंद दिघेंचा अपघात व त्यांच्यावरच्या उपचाराचा प्रसंग पाहणे देखील टाळले.
दिवंगत आनंद दिघे यांच्यावर आधारित असणारा धर्मवीर हा चित्रपट गेल्या आठवड्यात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या काही नेत्यांसह रविवारी सायंकाळी हा चित्रपट पाहण्यास गेले होते. मात्र दिघेंच्या अपघाताचा प्रसंग पुढे येण्यापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे हे चित्रपटगृहातून बाहेर पडले. चित्रपटातदेखील आनंद दिघेंचा अपघात व त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेले उपचार यांचाही समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती घटना न पाहताच चित्रपट अर्धवट सोडून चित्रपटगृहाच्या बाहेर पडले.
"दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे हे प्रसाद ओक यांनी जिवंत केले. कुठेच जाणवले नाही की मी चित्रपट पाहतो आहे. आयुष्य जगावं कसं हे आपण या चित्रपटातून शिकले पाहिजे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असायला हवा. त्यामुळे माता भगिनींचे रक्षण होईल. एक शिवसैनिक कसा असावा, यासाठी सर्वानी हा चित्रपट पहावा," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच "शिवसेना प्रमुख आणि आनंद दिघे यांचे नाते अधिक घट्ट होते. माझ्या समोर अनेक घटना घटलेल्या आहेत. बाळासाहेबांचा विश्वास आनंद दिघे यांच्यावर होता. आनंद दिघेंचे जाण हा आमच्यावर खूप मोठा आघात होता. त्यावेळी व्यथित झालेले बाळासाहेब मी पहिले आहते. म्हणून मी शेवटचा प्रसंग पाहू शकलो नाही," अशीही स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर उपचार सुरु असताना तेव्हाचे विद्यार्थी सेनेचे नेते आणि आत्ताचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दिघेंची भेट घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे हे दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेले. दिघेंवर एवढा गंभीर प्रसंग ओढवला असतानाही उद्धव ठाकरे हे एकदाही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या भेटीस गेले नाही. तसेच आताही धर्मवीर चित्रपटातील दिघेंवरील उपचार न पाहताच मुख्यमंत्री ठाकरे हे चित्रपटगृहातून निघून गेले.