मुंबई : "काल कौरवांची सभा झाली आज पांडवांची सभा होतेय" अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला वादळी प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय हा देवेंद्र फडणवीस गप्प बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिला. शिवसेनेच्या सभेत भाजपवर केल्या गेलेल्या प्रत्येक आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देऊन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरोधातल्या लढ्याचे रणशिंग फुंकले.
स्वतःच्या राज्याच्या प्रश्नांवर न बोलणारे पहिले मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे देशातील पहिले असे मुख्यमंत्री असतील जे स्वतःच्याच राज्यावर बोलत नाहीत. गेल्या दोन वर्षांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एकदाही राज्याच्या प्रश्नांवर बोलले नाहीत. कायमच केंद्र सरकारवर टीका करायची आणि आपण स्वतः काहीच काम करायचे नाही हाच यांचा कार्यक्रम आहे. संपूर्ण कोरोना काळात आम्ही रस्त्यावर उतरून काम केले आणि याच काळात उद्धव ठाकरे फक्त फेसबुक लाईव्ह होते आणि आम्ही लाईव्ह राहून काम करत होतो. अशा शब्दांत उद्दाहव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणाची हिम्मत नाही
उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे पण कोणाच्या अंगात ही हिम्मत नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकेल अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. आम्हांला मुंबई वेगळी करायची आहे पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून असा टोला फडणवीस यांनी लगावला. आमच्या तलवारी म्यान नाहीत, आम्ही मुकाबला करणारच असा इशारा फडणवीस यांनी दिला.
बोलायला काही नसले की पातळी सोडून बोलतात
उद्धव ठाकरेंकडे बोलायला काही नसले की ते पातळी सोडून बोलतात पण आम्ही तसे करणार नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडला. छत्रपती संभाजी महाराजांना ज्याने क्रूरपणे मारले त्याच्या कबरीवर माथा टेकणाऱ्यांचा धर्म हा राज्याचा धर्म बनला आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर प्रहार केला.