मुंबई : "मी शिवसेना प्रमुख जरुर पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख.", अशा हुंकारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाद्वारे शिवसेनेने १४ मे रोजीच्या सभेचा टीझर लाँच केला आहे. 'साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाचं पाहिजे', अशी भावनिक साद शिवसैनिकांना घालण्यात आली आहे.
१४ मे रोजी सायं, ७ वाजता वांद्रे येथील बीकेसी मैदानात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सभेचा आता तिसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तरे देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या धडाक्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता मास्क उतरवून सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. तिसऱ्या टीझरद्वारे शिवसेनेने नेमके कुणाला लक्ष्य केले आहे याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.