शोषित समाजघटकांचा राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2022   
Total Views |
 

ram 
 
 
१४ वर्षांच्या वनवासामध्ये रामाच्या सहवासात येणारे बहुतेक सगळेच सहकारी आजच्या आधुनिक जगातले बहुजन समाजाशी वारसा सांगणारे पूर्वज आहेत. राम प्रत्येक क्षणी या समाजघटकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच ‘आम्ही रामवंशी आहोत’ असे महाराष्ट्रातील रामोशी समाज म्हणतो; नव्हे देशातील कोणताही समाज हा आपली समाजमिथक कथा सांगताना रामाशी नाते जोडल्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळेच सर्व समाजघटकांचा प्रतिनिधी असलेले राम संविधानाच्या पुस्तकातही चित्रीत झाले. किन्नर एक शोषित वंचित घटक. स्त्री-पुरूष, किन्नर, पशू-पक्षी, वृक्षवेलींना आपलासा वाटणारा राम! हा राम शोषित वंचित समाजघटकांच्या जीवनातला राम आहे.
 
 
सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट चर्चेत आहे. यामध्ये शहरी नक्षलवादी असलेली प्राध्यापिका चित्रपटातल्या नायकाला चिथावण्यासाठी आणि त्याने दहशतवाद्यांना समर्थन द्यावे, यासाठी त्याला सांगते, ”जे सांगितले जाते किंवा जे दाखवले जाते, ते सत्य नसते. सत्य त्यापलीकडले असते.” अर्थात, तिला जे सत्य दाखवायचे असते, ते कुटिल आणि खोटेच असते. हे असेच कुटिल असत्य आज समाजातील काही तथाकथित निधर्मी विचारवंत किंवा पुरोगामी मान्यवर दाखवत आहेत. त्यापैकी एक कुटिल असत्य म्हणजे प्रभू श्री रामचंद्र हे शोषित पीडित समाजघटकांचे शत्रू होते, मारक होते. त्यांनी स्त्री, दलित आणि शोषित, वंचित घटकांच्या हक्कांचे हनन केले. त्यांच्याशी अमानवीय क्रूर वर्तन केले. हे सांगताना ते सीतेचा त्याग, अग्निपरीक्षा आणि शंबूकवध वगैरे उदाहरणे देऊन जनसामान्यांच्या मनात प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
 
 
तसेच महाराष्ट्रातल्या वस्त्यांमध्येही काही ठिकाणी कार्यक्रम ठरलेले असतात. आमच्यावर प्राचीन काळापासून अत्याचार होतो, हे सांगताना मग डफली वाजवत ते हमखास शंबूकची कथा सांगतात. तो शंबूक आमच्या समाजाचा होता. तो उलटा झाडाला लटकून तप करत होता. तेव्हा रामाने त्याला बेसावध, नि:शस्त्र असताना मारले. काय गुन्हा होता? अस्पृश्य होता म्हणून? त्याने तप केला, तर रामाचे राजपद धोक्यात येणार होते ना? म्हणून रामाने त्याचा खून केला. आम्हाला तप करण्याचा, आम्हाला राज्यकर्ते बनण्याचा हक्क रामाने त्यावेळी हिरावून घेतला. शंबूक पुढे रोहित वेमुला ते अगदी कोरेगाव-भीमाची हिंसा घडवणार्‍या शहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनापर्यंत हे सगळे येऊन थांबते. शंबूकचे नाते असे नक्षल्यांच्या समर्थनापर्यंत आणले की, मग ते शांत होतात. पण, वाल्मिकी रामायणातल्या खूप सार्‍या घटना दर्शवितात की, प्रभू श्री रामचंद्र हे शोषित, वंचित, घटकांचे कैवारी होते. सखा होते, तारणहार होते. रामायण जिच्या कुटिलतेने घडले ती मंथरा किंवा राणी कैकेयी यांच्याशी प्रभू श्रीरामांचे वर्तन कसे होते? वनवासातून परतल्यावर रामचंद्र सर्वप्रथम कैकयीकडे जातात. का? तर तिच्या कृत्याबद्दल तिला अपराधी वाटत असेल म्हणून.
 
 
दुसरीकडे शत्रुघ्न मंथराला मारू इच्छितो. तेव्हा त्याला भरत म्हणतो, “नको मारूस तिला, बंधू रामाला हे कळले, तर आवडणार नाही की, तू मंथरेला मारलेस.” थोडक्यात, रामाला १४ वर्षे वनवासात पाठवण्याची तरतूद करणार्‍या मंथरा आणि कैकेयी या कुटिल महिला प्रवृत्तींसोबतही रामाचे वर्तन करूणामय आहे. त्यांना तो दुखावत नाही. ऋषी विश्वामित्र ताडका राक्षसिणीचा वध करण्यास रामाला सांगतात. तिचा वध न्यायपूर्ण आहे, याची खात्री देतात आणि तेव्हा राम तिचा वध करतात. एका राक्षसी प्रवृत्तीच्या संहारक स्त्रीबाबतही रामाचे हे विचार होते.
 
 
शिळारूपी अहिल्येची कथा काय सांगते? अहिल्येबद्दल अनेक मिथककथा आहेत. पण, सारांश की, ती पथभ्रष्ट असते. तिला शाप असतो. रामाच्या पदस्पर्शाने ती शापमुक्त होणार असते. स्त्रियांना आणि एकंदरीतच दुर्बलांना पथभ्रष्ट ठरवणे त्याकाळी काय, आजही फार सोपे आहे. पण, तारणकर्ते होणे कठीण! प्रभू श्रीरामचंद्र अहिल्येला तिच्या भूतकाळाबद्दल काहीएक न विचारता तिचा उद्धार करतात. उद्धार म्हणजे काय केले असावे? तर तिला पुन्हा जनमानसात आणतात.
 
 
वनवासी शबरी. समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या शबरीची उष्टी बोरे खाणारा राम. उष्टी बोरे का खाल्ली, तर शबरीचा खरा भक्तिभाव पाहून! तिच्या भावना दुखावू नये म्हणून! जगाचा तारणहार असलेल्या रामाने वनातल्या वनवासी शबरीची उष्टी बोरे खाणे यातच रामाचे आणि समाजातल्या तळागाळातल्या वंचित घटकांचा स्नेहभाव चटकन दिसून येतो. इतकेच काय तर रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचे काय? ज्या पुरूषाने आपल्या पत्नीला त्रास दिला, त्या पुरुषाच्या पत्नीशी कसे वागावे? प्रचलित परंपरा होती ती पराजिताची पत्नी म्हणून राम तिला अयोध्याला दासी म्हणून नेऊ शकत होते. पण, प्रभू रामचंद्रांनी तिचा लंकेवरील हक्क अबाधित राहावा, तिचे सौभाग्य अबाधित राहावे, यासाठी तिला बिभीषणाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. राम महिलाविरोधी होता म्हणणारे किंवा हिंदू धर्मपरंपरेत पती निधनानंतर महिलांनी सती जाणे, केशवपन करणे किंवा सर्व सुखसोईंचा त्याग करावा, असे धर्मनियम आहेत, म्हणणारे रामाने मंदोदरीला तिच्या स्त्रीसुलभ आणि मानवी हक्कापासून वंचित केले नाही, याबद्दल कधी बोलणार?
 
 
असो. सीतेच्या प्रेमाखातर बलाढ्य राक्षसराजाशी युद्ध करणार्‍या, त्यासाठी अनंत लढा लढणारा राम खरेच प्राणप्रिय सीतेशी कधीतरी वाईट वागेल का? नाहीच. वनवासातील १४ वर्षांपैकी राम दहा वर्षे दंडकारण्यात होते. इथे आदिम वनवासी समाजाची वस्ती. आजच्या भाषेत वंचितांची वस्ती. या समाजघटकांशी राम दुष्ट, त्यांच्या हक्काचे हनन करून राहिले असते, तर या दंडकारण्यात रामाला जीवाला जीव देणारे गरुड समाजाचे जटायु, वानर गटातील हनुमान असे भक्तगण मित्र लाभले असते का? राम या अरण्यातील समाजघटकांसोबत नुसते गुण्यागोविंदाने नव्हे, तर त्यांचे प्राणसखा बनून राहिले. अयोध्येहून वनवासाकडे प्रस्थान करताना किंवा राम-रावण युद्धात रामाला सहकार्य करणारे कोण होते? प्रस्थापित-सुस्थापित असे कुणी नव्हते. उलट रामाला गंगातीरापलीकडे नेणारी व्यक्ती होती राजा निषाद गुह. नौका चालवणारा मल्ल. एक केवट. पण, निषाद रामाचा जिवलग मित्र होतो. राम जर वर्ण किंवा वर्ग व्यवस्थेनुसार भेद करत असते, तर निषादशी मैत्री कशी झाली असती? निषाद प्रभू श्री रामचंद्रांचे चरणपूजन करण्याची इच्छा व्यक्त करतात. त्याकाळी राजपुत्राला सार्वभौमतेचे अधिकार असतीलच. केवटाने नौकाचालकाने राजपुत्राचे चरण धुण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यात काही नावीन्य नसणारच! पण, प्रभू श्री रामचंद्रांना संकोच वाटतो. ते निषादाला नकारच देतात. तेव्हा निषाद म्हणतो, “मला तुमचे चरणकमल पुजू द्या, नाही तर मी दुसर्‍या तीरावर नेणार नाही.” रामाचे या जनसामान्यांशी इतके सौहार्दाचे, आपलेपणाचे नाते होते की, ते रामाशी स्पष्ट संवाद साधू शकत होते.
 
 
आता वळूया शंबूकवधाकडे. याबाबत तर रामायण अभ्यासकर्त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. शंबूकवध ‘उत्तरकांडा’त येते. त्यामध्ये नि:शस्त्र तप करणार्‍या मागासजातीच्या शंबुकाचा वध राम करतो, अशी घटना आहे. पण, ‘उत्तरकांडा’पूर्वीच्या ‘बालकांड’ ते ‘लंकाकांड’ या सहा कांडांमध्ये अनेकवेळा राम स्वत:च्या जन्माचे कर्तव्य हे ऋषी तपस्वींचे रक्षण करणे आहे, असे सांगतात. रामायण लिहिणारे वाल्मिकी हे पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी. ते रामाचे समकालीन. ते तपस्वी, विद्वान आणि रामायण लिहिण्याइतके बुद्धिमान होते. क्षुद्र समाजाच्या व्यक्तीने तप किंवा बुद्धिमत्तापूर्ण कार्य करू नये, असे जर रामांचे मत असते तर मग त्यावेळी वाल्मिकींनी रामायण लिहायला ते जगले तरी असते का? दुसरे असे की, ‘उत्तरकांडा’त म्हणजे सातव्या कांडात राम नि:शस्त्र शंबूकाचा वध करतात. मात्र, सहाव्या कांडात शुक आणि सारणी या रावणाच्या दोन हस्तकांचा वध करत नाहीत. ते दोघेही काही उच्च कुळातले नव्हते. उलट रामाच्या लंकेविरोधी सेनेत कोण आहेत, ही गुप्त माहिती काढण्यासाठी ते आलेले असतात. ते पकडले जातात. त्यांना रामापुढे उभे केले जाते. त्यावेळी राम म्हणतात, “नि:शस्त्र व्यक्तीचा वध करण्याची परंपरा नाही.” ते शुक आणि सारणला सोडून देतात. सहाव्या कांडात नि:शस्त्र आणि सामाजिक राजकीयदृष्ट्या खालच्या स्तरावर असलेल्या तेही शत्रूपक्षातील व्यक्तींना जीवदान देणारे राम त्यांच्याच रामराज्यातील तप करणार्‍या व्यक्तीस काही एक विचारपूस न करता त्याला मारून टाकतील का? शक्यच नाही.
 
 
पण, काही लोक हे थोतांड पसरवतात का? तर भारतात रामाने लोकांना एका संस्कृतीत बांधले आणि त्यामुळे या देशाची एकता धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समरस राहिली. या देशाला तोडायचे कसे? या समाजात दुही माजवायची कशी? तर जनमानसातल्या आदर्श रामाची छबी तोडली गेली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचे तर राम हा कसा दुष्ट होता, जातिभेद करणारा, स्त्रियांना, दुर्बलांवर अत्याचार करणारा होता, त्यांचे हक्क नाकारणारा होता हे सांगितले पाहिजे. पण, सत्याला आच नसते. जनमनातला राम हा खरेच शोषित-वंचित समाजघटकांचा जीवनातला राम होता.
 
 
‘वाल्मिकी रामायणा’सह इतर १८ रामायणे आहेत. या सगळ्या रामायणातल्या घटना आणि पात्र मूळ रामायणाभोवती फिरतात. पण, त्यात काही फरकही आहेच. ‘कंब रामायणा’त कंब ऋषींनी लिहिले आहे की, ‘उत्तरकांड’ हे प्रक्षिप्त आहे. प्रक्षिप्त म्हणजे सत्याचा आधार नसलेले. त्यामुळे ‘उत्तरकांडा’मधला शंबूकवध किंवा सीतामातेची अग्निपरीक्षा हे सत्य मानूच शकत नाही. 
जालिंदर कांबळे, रामायणाचे अभ्यासक
 
 
‘उत्तरकांडा’च्या आधीच्या सहा कांडांची शब्दरचना आणि ‘उत्तरकांडा’ची शब्दरचना यामध्ये कमालीची तफावत आहे. ही तफावत केवळ शब्दांत नाही, तर प्रभू श्रीरामांनी प्रस्थापित केलेल्या मानवी नीतिमूल्यांनाही छेद देणारी तफावत आहे. त्यामुळे मूळ सहा कांडांचे ‘वाल्मिकी रामायण’ आणि नंतरचे ‘उत्तरकांड’ हे सरसकट एक नाही. ‘वाल्मिकी रामायण’ घडून गेल्यानंतर हजारो वर्षांनी मूळ ‘वाल्मिकी रामायणा’तल्या रामाचे चरित्रहनन करण्यासाठी कुणीतरी ‘उत्तरकांडा’त सीता अग्निपरीक्षा आणि शंबूकसारख्या काल्पनिक घटना मुद्दाम लिहिल्या आहेत. या दोन्ही घटनांचा प्रभू श्रीरामचंद्रांशी काही संबंध नाही. मुळात ‘उत्तरकांड’ हे मूळ ‘वाल्मिकी रामायणा’चा भाग आहे, तर मग सहाव्या ‘लंकाकांडा’तच रामायणाची सफलता कशी दर्शवली गेली?
डॉ. बालमुकूंद पांडेय,
राष्ट्रीय संघटन सचिव, अखिल भारतीय इतिहास संकलन समिती
 
 
@@AUTHORINFO_V1@@