मुंबई : बांग्लादेशचे माजी सरन्यायाधीश एबीएम खैरुल हक यांना गुरुवारी त्यांच्याच घरातून अटक करण्यात आली. खैरुल हक यांनी २०११ मध्ये निवडणुकीसाठी काळजीवाहू सरकारची पद्धत रद्द करणाऱ्या अपीलीय खंडपीठाचे नेतृत्व केले होते. ढाका महानगर पोलिसांनी ढाका येथील धनमोंडी येथील त्याच्या घरातून अटक केली. त्यांना माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जाते. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारने आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अटक केली असून, त्यात आणखी एक भर म्हणून सांगितते जात आहे.
एबीएम खैरुल हक यांना सध्या बांगलादेश न्याय विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात दोन खटले दाखल करण्यात आले असून नेमके कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे वकील मुजाहिदुल इस्लाम शाहीन यांनी खैरुल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि निकालांमध्ये खोटेपणा केल्याच्या आरोपाखाली शाहबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर त्यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आणि संविधानातील १३ वी दुरुस्ती रद्द करण्याचा निर्णय बदलण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.