भारताच्या युएव्ही लाँच्ड प्रिसिजन गाईडेड मिसाईलच्या यशस्वी चाचण्या

    25-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली,
  युएव्ही लाँच्ड प्रिसिजन गाईडेड मिसाईल (युएलपीजीएम)-व्ही३ च्या यशस्वी उड्डाण चाचण्या पार पाडल्या असून, हे संरक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यातील नॅशनल ओपन एरिया रेंज या चाचणी रेंजमध्ये ही चाचणी पार पडली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) तसेच औद्योगिक भागीदारांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठा बळकटी देणारा टप्पा गाठण्यात आला आहे. डीआरडीओ ने युएव्ही लाँच्ड प्रिसिजन गाईडेड मिसाईल (युएलपीजीएम)-व्ही३.”

ही मिसाईल अत्यंत अचूक लक्ष्यभेदक क्षमतेसाठी ओळखली जाते आणि मानव रहित हवाई वाहनांमधून (युएव्ही) लाँच करता येते. ही चाचणी आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत देशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
दरम्यान, याच वर्षी मे महिन्यात भारतीय लष्कराने देशभरातील प्रमुख ठिकाणी व्यापक क्षमतेच्या चाचण्या केल्या होत्या. यात पोखरण, बबीना, जोशीमठ येथे फील्ड फायरींग रेंजमध्ये विविध यंत्रणांची परीक्षणे झाली होती. आग्रा आणि गोपालपूर येथे विशेष हवाई संरक्षण उपकरणांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली होती. या चाचण्या जवळपास प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थितीत पार पडल्या असून, यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिम्युलेशन्सचाही समावेश होता. या माध्यमातून अत्याधुनिक प्रणालींचे कठोर परीक्षण करण्यात आले. या प्रकारच्या चाचण्या "डेकड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन" या लष्कराच्या रूपांतरणाच्या दशकासाठी आखलेल्या योजनांचा एक भाग आहेत. त्याचा उद्देश म्हणजे बदलत्या युद्धभूमीच्या गरजांनुसार नव्या तंत्रज्ञानाचे जलदगतीने अंगीकार करणे हा आहे.