मुंबई: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात जगतिक पातळीवर वाढत चाललेल्या महागाईने ग्रासल्याचे दिसून आले. तब्बल ७१५ अंशांची घसरण होऊन सेन्सेक्स ५७,१९७ अंशांवर येऊन थांबला. निफ्टी मध्येही जोरदार पडझड दिसून आली. २२६ अंशांनी घसरून निफ्टी १७,१७२ अंशांवर येऊन थांबला. अमेरिकी फेडरल बँकेने महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत त्याचेच पडसाद शुक्रवारी दिसून आले. दिवसभर हेच चिंतेचे वातावरण बाजारात होते.
ऑटो, मेटल, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, बँक, आयटी या सर्वच क्षेत्रांत जोरदार घसरण दिसून आली. बाजराची सुरुवात ३७९ अंशांच्या घसरणीनेच झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीची भूमिका न घेता अजूनपर्यंत बाजाराला अनुकूल धोरण स्वीकारला आहे. लांबलेले रशिया - युक्रेन युद्ध, कोरोना साथीची वाढती भीती यांमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर महागाईचे ढग गडद होत आहेत, त्याचेच हे परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.