मुंबई : ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केले आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. ईडीने प्रवीण राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अटक केली होती.
प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. जे १० वर्षानंतर परत करण्यात आले असे समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरीही छापा टाकला होता आणि पाटकर यांची चौकशीही केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेल्या वाधवान कुटुंबियांशीसुद्धा त्यांची जवळीक आहे.
या घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यासह हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे सारंग वाधवान, राकेश वाधवान आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक यांचाही या प्रकरणात आरोपी म्हणून सहभाग आहे. १०३४ कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी राऊतला या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ईडीने अटक केली होती. हे संपूर्ण प्रकरण पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक ४३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे.