“तुझी शिक्षिका होण्याची लायकी नाही,” असे अपमानास्पद बोल लावत तिला वर्गाबाहेर हाकलले गेले. पायाच्या शस्त्रक्रियेकरिता पैसे जमविण्यासाठी धडपडणार्या तिने गावभर मदतयाचना केली. मात्र, एक रुपयाही तिच्या पदरात पडला नाही. संपर्काचे कसलेही साधन नसताना दुर्गम भागात तिने तरीही शिक्षिकेची नोकरी केली. अशा या पाचवीला पुजलेल्या संघर्षाशी दोन हात करत ५२ अनाथ लेकरांना आईची सावली देत तिने हक्काचे छप्पर दिले.
तेव्हा जाणून घेऊया, ‘सेवा सदन’ संस्थेच्या माध्यमातून अनाथांची माय ठरलेल्या मीरा कदम यांच्याविषयी...लातूरच्या तांदुळजा गावात १९८२ साली जन्मलेल्या मीरा कदम यांना वयाच्या १८व्या महिन्यात पोलिओ झाला. शेतात घर असल्याने शाळेत येणे-जाणे शक्य नसल्याने आजोळ असलेल्या उस्मानाबादच्या करंजकल्ला येथील जि. प. शाळेतून सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ‘माझ्या घरात पहिला जन्म मुलीचा व्हावा, तिचे नाव मीरा ठेवावे आणि तिला शिक्षिका बनवावे,’ असे मीरा यांच्या वडिलांचे स्वप्न होते. मुलीला शिक्षिका बनविण्यासाठी वडील शक्य तितके प्रयत्नरतही होते.
पण, चौथीपर्यंत मीरा यांना अक्षरशः उचलून शाळेत नेऊन बसवावे लागे. सातवीपर्यंत पायात काहीसा त्राण आल्यानंतर त्यांनी पुन्हा तांदुळजा येथील शाळेत प्रवेश घेतला. वक्तृत्वाची आवड असलेल्या मीरा यांनी भाषणासाठी नाव नोंदवल्यावर शिक्षकांकडून उभे राहून त्यांना बोलता येईना. त्यामुळे त्यांना “तू भाषण करू नको,” असे सांगण्यात आले. मात्र, तरीही त्यांनी मागे न हटता घरी आरशासमोर भाषणाचा सराव सुरूच ठेवला. शाळेत मुलंमुली मैदानावर खेळत असताना मीरा फक्त त्या मुलांना पाहत बसायच्या. मात्र, चिरके गुरूजींनी त्यांना योगासने शिकवत प्रोत्साहन दिले.
दहावीला वर्गातील विद्यार्थी इंग्रजी आणि गणितात कच्चे असल्याने मीरा यांनी वर्गातील उत्तम नेतृत्वगुण असलेल्या धनराज कदम यांना एक संकल्पना सांगितली. या संकल्पनेनुसार सर्व विद्यार्थी शाळेत लवकर येत. त्या सर्वांना मीरा टेबलचा आधार घेत जे गुरूजींनी शिकवले आहे, तेच पुन्हा शिकवत. सर्वजण उत्तीर्ण झाल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानंतर सर्वजण मीरा यांच्या घरी पेढे घेऊन आले. घरापासून २८ किमी दूर मुरूडच्या जनता विद्यामंदिरमध्ये मीरा यांनी अकरावीला प्रवेश घेतला. याठिकाणी महाविद्यालयापासून एक किमी अंतरावर त्यांनी एक खोली भाड्याने घेतली.
वेळेच्या दीड तास आधीच त्या महाविद्यालयामध्ये पोहोचत. अनेकदा बाटलीतील पाणी संपल्याने त्यांच्या घशाला कोरड पडायची. गुडघ्यावर हात ठेवून मीरा यांना चालता यायचे. मात्र, ३०-४० फूट अंतर चालल्यानंतर त्यांचा गुडघ्यावरील हात घसरून त्या खाली पडायच्या. सहा विषयांसाठी सहा वर्ग बदलावे लागत. त्यामुळे सर्व दप्तर वगैरे घेऊन जाताना त्या अनेकदा जमिनीवर पडत. गुडघे आणि कोपर यांना सतत इजा व्हायची. शेतकरी असलेले वडील आपल्या मुलीला शहरात शिकवतात, याचाच मीरा यांना प्रचंड अभिमान होता.
यानंतर मुरूडमध्येच शासकीय डी.एड महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ‘सूक्ष्मपाठ’ नावाचा भाग होता. त्यात पाच मिनिटे उभे राहून फलकलेखन करून एखादा मुद्दा समजून सांगावा लागे. त्यावेळी मीरा यांनी, “मला सलग पाच मिनिटे उभे राहता येत नाही. त्यामुळे मला बसण्याची किंवा आधार घेण्याची परवानगी द्या,” अशी आर्जवे करूनही शिक्षकांनी ती मान्य केली नाही. मीरा यांनी हातापाया पडूनही, “तुझी लायकी नाही शिक्षिका होण्याची. तुझ्यामुळे पिढी घडण्याऐवजी बरबाद होईल.
तुझे हे क्षेत्र नाही, त्यामुळे कॉलेज सोडून घरी जा,” असे ओरडत शिक्षकांनी त्यांना वर्गाबाहेर काढले. केवळ दिव्यांग असल्याने आपल्याला एवढासा भाग शिकवता येत नाही, याचे मीरा यांना शल्य वाटले. आठ दिवस त्या महाविद्यालयात गेल्या नाही. आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात घोंगावू लागले. मित्रमैत्रिणींनी त्यांना धीर दिला आणि मीरा यांना सावरण्यास मदत केली. दरम्यान, संपूर्ण महाविद्यालयीन काळ संपेपर्यंत त्या एका शिक्षकाचा राग त्यांच्यावर कायम राहिला.
२००२ मध्ये मीरा यांची २२० किमी दूर हिंगोली जिल्ह्यातील कोंडवाडा जि. प. शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. संपर्काचे कसलेही साधन नसताना त्या काळात गावाबाहेरील शेतकर्याच्या एका खळ्यामध्ये त्या भाड्याने राहू लागल्या. खोली कसली कोंडवाडाच तो! अंधार्या खोलीत कांदा, लसूण अशा शेतीमालासह साप, विंचू, उंदरांचा नेहमी वावर... अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन त्या राहत. भीतीपोटी त्यांनी कित्येक रात्री अशाच जागून काढल्या. घरी प्रचंड गरिबी असल्याने एक रुपयासुद्धा वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे शालेय पोषणाहार हेच त्यांचे जेवण. एक वर्षाच्या आजारपणानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
संघर्षाला तोंड देत हळूहळू त्या मंदिरात जाऊन महिलांना पोथी वाचून देऊ लागल्या. सुट्ट्यांमध्ये आईकडे गेल्यानंतर त्यांनी पायाच्या शस्त्रक्रियेचा विषय काढला. शस्त्रक्रियेसाठी ३० हजार रुपये आवश्यक होते. ते जमविण्यासाठी त्यांनी आईला न सांगता एक डब्बा घेऊन त्यामध्ये १५ दिवस गावभर फिरत एक रूपया मदत देण्यासाठी टाहो फोडला. वडिलांनी गावासाठी भरपूर केले. मात्र, त्या डब्ब्यात एक आणाही पडला नाही. त्यानंतर त्या त्यांच्याच भावकीतील एका श्रीमंत नातलगाकडे पाच हजार उधार मागण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांनी “तू इथं आलीच कशी? तुझी काय लायकी आहे?” असे ओरडून मीरा यांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडले. तो नातलग हसत राहिला.
इकडे मीरा मात्र पळता येत नसल्याने गयावया करू लागल्या. आजूबाजूचे लोक मदतीला आले. रडतरडत त्या घरी गेल्या. मात्र, आईला काहीही कळू दिले नाही. कारण, आईला कळू दिले असते, तर तिने जीव दिला असता. आणखी काही नातेवाईकांकडे गेल्या, पण मदत राहिली बाजूला, त्यांनी दिव्यांग मुलगा बघून लग्न उरकण्याचा मीरा यांना सल्ला दिला. अखेर काही पैशांची जमवाजमव करत कोल्हापूरला पी. जी. कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने मिरा यांच्या एका पायाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे गुडघ्यावर हात ठेवून चालण्याऐवजी ‘कॅलिपर’च्या साहाय्याने त्यांना काही वेळ उभे राहता येऊ लागले. दिव्यांग असल्याने विवाह होणार नाही, असा विचार करणार्या मीरा यांचा एका पक्षाचे तालुकाप्रमुख व पत्रकार असलेले वर्गमित्र धनराज कदम यांच्याशी पुढे २००५ साली विवाह झाला.
इकडे कोंडवाडा शाळेत त्या चांगल्याच परिचित झाल्या. कवितालेखनासह शाळेतील मुलांना त्या मदत, आधार देत. यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांनाही त्या मदतीचा हात देऊ लागल्या. शेतकर्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी त्या गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन प्रबोधन करीत. शेतकर्याला आत्महत्येपासून परावृत्त करायचे आहे, हाच विचार सोबत घेऊन त्या समुपदेशनासह ‘माझ्या शेतकरी बापाला...’ हे पत्र प्रबोधनावेळी वाचून दाखवत.
शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समजताच, त्या तत्काळ घरी जाऊन सांत्वन आणि मदत करत. विविध ठिकाणी त्यांना भाषणासाठी बोलावले जाऊ लागले. २०१२ ते २०१७ पर्यंत त्या नागाशिमगी येथे वास्तव्यास होत्या. यावेळी त्यांनी ठोस काम करण्याचा निश्चय करत पाच मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. यानंतर जिल्हाभरात मीरा परिचित झाल्या. पाच मुलांपासून सुरू झालेला प्रवास नंतर २५ मुलांना दत्तक घेण्यापर्यंत पोहोचला.
दरम्यान, अंतुलेनगर येथील शाळेत बदली झाल्यानंतर मीरा यांनी २०१८ साली या सर्व मुलांना एकत्र आणून ‘साथ फाऊंडेशन, तांदुळजा’ ही संस्था सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी हिंगोली शहरातील जिजामाता नगर येथील १३ खोल्यांचे ‘सेवा सदन’ हे वसतिगृह भाड्याने घेतले. याच माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी, उसतोड कामगार आणि आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या ५२ मुलांचा सांभाळ मीरा करत आहे. यातील अनेकजण एमबीबीएस, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून काही नोकरीदेखील करतात. व्याख्यानाद्वारे मिळणारे मानधन, पगार व पतीची मदत आणि लोकसहभाग यावर सध्या संस्था उभी आहे. मीरा यांनी लिहिलेली ‘बळीराजा, तू जगायला हवं’ ही छोटी पुस्तिका आणि ‘फुलपाखरे’ हा बालकवितासंग्रह प्रकाशित आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी, विधवा महिलांसोबत संक्रांत साजरी करणे, विधवा व दिव्यांगांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मुलामुलींचे मेळावे अशा अनेक विषयांवर मीरा यांची संस्था काम करते. मीरा या ‘नाम फाऊंडेशन’च्या जिल्हा समन्वयक आहेत. आतापर्यंत ६० कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचे धनादेशही ‘नाम’मार्फत देण्यात आले. कोरोनाकाळात मीरा यांनी अक्षरशः कर्ज काढून संस्था चालविली. वर्गात उचलून घेऊन जावे लागणार्या मीरा कदम या आजघडीला ५२ अनाथ लेकरांना मायेची सावली देत आहे. वडिलांचे स्वप्न घेऊन जगणार्या आणि आईचा संघर्ष साक्षी ठेवत मीरा यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत स्वतःला सिद्ध केले आहे. दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे अनाथांची आई बनलेल्या मीरा कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम...
- पवन बोरस्ते
(70585 89767)
आपल्या जीवनात संघर्ष अटळ आहे. मात्र, संघर्ष आणि वेदनेचा बाऊ न करता धाडस व हिमतीने जगले पाहिजे. ‘करून जावे असेही काही दुनियेतूनी या जाताना, गहिवर यावा जगास सार्या निरोप शेवट देताना’ या ओळींना कायम ध्यानीमनी ठेवून पुढे जावे. समाजातील प्रत्येक वेदनेवर शक्य तितकी फुंकर घालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. जिंकायचे असेल, तर कधीही लढणे सोडू नये. - मीरा कदम