रात्रीच्या अंधारातील प्रकाश किरणांचा प्रवास पाहण्यासाठी जो आनंद मिळतो, त्याहूनही अधिक आत्मानंद हा त्या दृश्यांना कॅन्व्हासवर उतरविण्यात मिळतो, असे चित्रकार ललित पाटील यांनी सांगितले. त्यांच्या रंगलेपनात ‘ऑईल रंग’ हा जाड आणि पातळ स्वरुपातही ते, सफाईने मांडू शकतात, ही त्यांची खासियत आहे.
'व्हिज्युअल आर्ट’ म्हणजे ‘दृश्यकला.’ दिसणार्या दृश्यामध्ये कला असतेच, ती शोधण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते, तो ‘दृश्यकलाकार.’ ‘दृश्यकला’ ही वातावरण बदलवून टाकते. निसर्गात दिसणारी प्रत्येक वस्तू जशी दिसते तशी आणि जशी असते तशी पाहिली जाते. कलाकाराला मात्र त्या वस्तूकडे बघण्यासाठी ‘कल्पनाशक्ती’ने तिसरा डोळा दिलेला आहे. ‘कल्पनाशक्ती’लाखरंतर आदिमाया शक्तीचं अंशात्मक रुपच म्हणावे. कारण, समोर असणारी वस्तू दिसते कशी? असते कशी? याशिवाय कलाकार त्या वस्तूकडे कोणत्या नजरेने पाहतो, यावर बरेच अवलंबून असते. कलाकाराच्या वैचारिक आणि काल्पनिक बैठकीनुसार त्या वस्तूतील सौंदर्य तो द्विमित वा त्रिमित आकारात व्यक्त करीत असतो. त्यामुळे अशा कलाकृतींमध्ये दोन घटकांचा संगम झालेला पाहायला मिळतो. एक म्हणजे निसर्गानुसारी ती वस्तू जेव्हा असते तेव्हा तिच्यातील नैसर्गिकपण आणि ती वस्तू जेव्हा दृश्यकलाकार जेव्हा पाहतो तेव्हा तिच्या नैसर्गिकपणात या कलाकाराने त्याच्या कल्पनेपणाने पाहून नंतर निर्माण केलेली कलाकृती... अशा संगमातून, निर्माण होणारी कलाकृती ही सौंदर्यपूर्णच असते.
मुंबईस्थित खूप प्रसिद्ध नसलेले मात्र जगभरातील महत्त्वाच्या कलादालनांपर्यंत समर्थपणे पोहोचलेले, प्रयोगशील चित्रकार ललित पाटील हे एक यशस्वी ‘व्हिज्युअल आर्टिस्ट’ आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी भरपूर रेखांकने, पेंटिंग्ज आणि ‘इन्स्टॉलेशन’ किंवा ‘मांडणी शिल्प’ या प्रकारांतून कामे केलेली आहेत. ‘लॅण्डस्केप्स’ (स्थापना कला) मध्ये त्यांनी रात्रीच्या वेळी भरपूर कामे केले आहे. रात्रीच्या वेळी समोर दिसणारा छाया-प्रकाश त्यांनी समर्थपणे चित्रबद्ध आणि रंगबद्ध केलेला आहे. ‘इन्स्टॉलेशन्स’ या प्रकारात त्यांनी ‘रिलीफ स्कल्पचर्स’ अधिक साकारलेली आहेत, ज्यात आता त्यांची ‘मास्टरी’ झालेली आहे.
चित्रकार ललित पाटील यांना सूर्यास्तानंतरच्या संधीप्रकाशात आणि नंतर होत जाणार्या गडद अंधारातील छायाभेदाने भुरळ घातली. अंधारातही जे दिसते त्यातही सौंदर्य असते, हेच त्यांच्या ‘नाईट स्केप्स’वरून ध्यानी येते. या वेळी अंधारातील करडा रंग ललित यांना अधिक मोहित करतो. ‘पर्शियन ब्ल्यू’, ‘सॅप ग्रीन’, ‘कोबल्ट ब्ल्यू’, ‘मॅजेंटा’ अशा खास वैशिष्ट्यपूर्ण रंगांचा वापर त्यांनी त्यांच्या ‘नाईट स्केप्स’मध्ये अधिक केलेला दिसतो. हीच त्यांच्या रंगलेपनाची वैशिष्ट्ये ठरावित. रात्रीच्या अंधारातील प्रकाश किरणांचा प्रवास पाहण्यासाठी जो आनंद मिळतो, त्याहूनही अधिक आत्मानंद हा त्या दृश्यांना कॅन्व्हासवर उतरविण्यात मिळतो, असे चित्रकार ललित पाटील यांनी सांगितले. त्यांच्या रंगलेपनात ‘ऑईल रंग’ हा जाड आणि पातळ स्वरुपातही ते, सफाईने मांडू शकतात, ही त्यांची खासियत आहे.
मुंबईतील खूप गर्दीची घरे, उंच इमारती, झोपटपट्टी या विषयांना त्यांनी त्यांच्या ‘पेंटिंग्ज’ विषय केले आहेत. त्यांच्या ‘पेंटिंग्ज’च्या रचना म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यांच्या कलाकृती जगभरातील निवडक गॅलरीज्मधील येणार्या कलारसिकांचे आकर्षण ठरल्या आहेत. त्यांच्या कलाप्रवासाला सदिच्छा!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ