मुंबई : संपूर्ण मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाला मिळणार नाही,अशी परिस्थिती असतानाही बोरिवली पूर्व आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महापालिका ६० कामगारांना नियुक्त करणार आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी पालिका १२ लाख ८० हजार रुपये मोजणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला.
पालिकेच्या आर मध्य विभागात अतिक्रमण निर्मुलन खात्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सन २०२१- २०२२ या आर्थिक वर्षांत १४ लाख ५७ रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीतून १७ एप्रिल २१ ते १६ ऑक्टोबर २१ या कालावधीसाठी ९ कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास वाढतच असल्यामुळे १७ ऑक्टोबर २१ ते ३१ मार्च २२ या कालावधीमध्ये कंत्राटी कामगारांच्या नेमणुकीसाठी निधीची कमतरता भासत आहे. सद्यस्थितीत अतिक्रमण निर्मुलन खात्यात पालिकेचे सकाळ सत्रामध्ये ४ कामगार आणि दुपारीही ४ कामगार कार्यरत असतात. मात्र ही संख्या अत्यंत अपुरी आहे.
आर मध्य विभाग हा अन्य विभागांच्या क्षेत्रफळांमध्ये मोठा आहे. या विभागातच मोठा प्रमाणात बेकायदा फेरीवाले आढळून आल्याने नित्यनेमाने या ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येते आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते, असा दावा पालिकेने केला आहे. या कारवाई करण्यासाठी कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. सद्यस्थितीत अतिक्रमण निर्मुलन आर मध्य विभागात एकूण ५ अतिक्रमण निर्मुलन वाहने असून, त्यापैकी एक वाहन महापालिकेचे आणि ४ खासगी वाहने आहेत. कारवाई करण्यासाठी प्रत्येक वाहनांवर सकाळी ६ आणि सायंकाळी ६ अशा एकूण ६० कामगारांची आवश्यकता आहे. अतिक्रमण निर्मुलन तसेच पदपथ सफाईसाठी आणखीन कामगारांची नियुक्ती करण्यात येईल.