नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे विधान म्हणजे समस्त गुजराती जनतेचा अपमान आहे,” अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दि. 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या विधानाचा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे सुपुत्र आहेत. ते केवळ गुजरातचाच नव्हे, तर देशाचा स्वाभिमान आहेत. भारतातील गरिबांना पुढे कसे नेता येईल. यासाठी ते काम करत आहेत. अशा व्यक्तीस रावण म्हणणे हा केवळ पंतप्रधान मोदींचा अपमान नाही, तर तो समस्त गुजराती जनतेचा अपमान आहे,” असे पात्रा यांनी म्हटले आहे.
खर्गे यांच्या या वक्तव्याबाबत सोनिया गांधींवर निशाणा साधत पात्रा म्हणाले की, “त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेले वक्तव्य हे सोनिया आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून केल्याचे सिद्ध झाले आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते, त्याचा काय परिणाम झाला होता, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे गुजराती मतदार काँग्रेसला योग्य प्रत्युत्तर देतील,” असेही पात्रा यांनी म्हटले आहे.