
जामनगर : ‘’ज्यांनी गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी रोखण्याचा प्रयत्न करुन अनेक वर्षे आपल्याला पाण्याच्या एकेका थेंबासाठी तरसवले, आज त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढली जात आहे,” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी आयोजित रॅलीनंतर पंतप्रधानांनी एका जाहीर सभेत ‘भारत जोडो’ यात्रेवर जोरदार टीका केली. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी हे ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभांमध्ये याचा आवर्जून उल्लेख करत आहेत.
गुजरात विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू असून पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभांचा सपाटा सुरू केला आहे. राज्यात या दोनही दिग्गज नेत्यांच्या दररोज चार-चार सभा होत आहेत.
काँग्रेस राजवटीत पाकपुरस्कृत घुसखोरी : अमित शाह
’काँग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानातून आलिया-मालिया देशात शिरायचे. त्यांच्या हल्ल्यांत रोज आपले जवान हुतात्मा व्हायचे. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकपुरस्कृत घुसखोरी थांबली आहे,” असे गृहमंत्री अमित शाह यांनी मेहसाणा येथे झालेल्या सभेत म्हटले आहे.
पाकिस्तान भाजप सरकारला घाबरतो. कारण आपले जवान घरात घुसून मारतात. काँग्रेसच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मोदींच्या काळात अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आल्याचेही त्यांनी म्हटले.
१ आणि ५ डिसेंबरला मतदान
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान दि. १ डिसेंबर रोजी होत आहे. दुसर्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.
तिरंगी लढतीत भाजपचाच आवाज
गुजरात विधानसभेत 24 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. काँग्रेस विरोधी पक्ष राहिला आहे. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाची एंट्री झाली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होत असली, तरी येथील जनतेचा कौल भाजपच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.