मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि सिनेअभिनेते रितेश देशमुख हे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लातूर ‘एमआयडीसी’ येथील एका भूखंड प्रकरणावरून रितेश आणि त्यांची पत्नी जेनिलिया देशमुख यांच्या कंपनीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. लातूर भाजपच्या तक्रारीनंतर चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांच्याकडून लातूर येथे एका कंपनीच्या उभारणीसाठी ‘एमआयडीसी’कडे एप्रिल २०२१ मध्ये भूखंडासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर तत्काळ कार्यवाही करून देशमुखांना ११६ कोटींचे कर्ज आणि इतर बाबी देण्यात आल्या आहेत. भूखंडासाठी ‘एमआयडीसी’कडे त्यापूर्वीच १९ अर्ज प्रलंबित होते.
परंतु, तत्कालीन परिस्थितीत सत्तेचा गैरवापर करत हा भूखंड देशमुखांना देण्यात आला आहे. त्यामुळे सादर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लातूर भाजपच्या पदाधिकार्यांकडून सहकारमंत्री अतुल सावे यांना करण्यात आली होती.
पदाच्या गैरवापरातून भूखंड गिळण्याचे उद्योग
रितेश देशमुख यांनी आपल्या कंपनीसाठी आवश्यक असलेला भूखंड मिळवण्यासाठी दि. ५ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता आणि त्यावर तत्काळ यंत्रणा कार्यान्वित होऊन अवघ्या दहा दिवसांमध्ये त्यांना तब्बल ६२ एकरचा भूखंड देण्याचा निर्णय प्रशासनाकडून देण्यात आला. देशमुखांनी कंपनीचे भागभांडवल साडेसात कोटी दाखवले होते.
परंतु, त्यांना जिल्हा बँकेकडून सुमारे ११६ कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात आले, ही धक्कादायक बाब आहे. या प्रकरणात थेटपणे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांचा सहभाग असून त्यांच्या मंत्रिपदाच्या गैरवापरातून आणि दुसरे बंधू धीरज देशमुख; जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, या दोघांच्या दबावातून भूखंड गिळण्याचे हे उद्योग आहेत. सरकारने तत्काळ अध्यक्षांसह जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे आणि रितेश यांना देण्यात आलेला भूखंड परत घ्यावा, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.
- गुरुनाथ मगे, जिल्हा अध्यक्ष, भाजप, लातूर शहर