टोकीयो : भारतासाठी सर्वात यशस्वी ठरलेल्या टोकीयो पॅरालिंपिकचा रविवारी समारोप सोहळा पार पडला. समारोप समारंभात 'सुवर्णकन्या' अवनी लेखरा भारतीय खेळाडूंच्या ध्वजवाहक होत्या. १९ वर्षीय अवनीने दोन पदके जिंकली ज्यात एका सुवर्णपदकाचा सामावेश आहे.
अवनीनं SH1 प्रकारात दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल थ्री पॉजिशनमध्ये कांस्य पदक जिंकलं. याशिवाय सिंहराज याने टोकीयोत दोन पदकं जिंकली. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य आणि ५० मीटर एअर पिस्टलमध्ये रौप्य पदक जिंकले.
समारोप समारंभात भारताच्या एकूण ११ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. २४ ऑगस्टला झालेल्या उद्घाटनाला पाच खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. शॉटपुटर टेकचंद ध्वजवाहक होते. त्यांनी हायजंपर मरियप्पन थांगवेलु यांची जागा घेतली होती. मरियप्पन हे कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगिकरणात रहावे लागले होते.
१९ पदकांवर भारताचे नाव
भारताकडे आता एकूण १९ पदकं आली आहेत. गेल्या ५३ वर्षात ११ पॅराऑलम्पिकमध्ये १२ पदके आली आहेत. १९६० पासून ही स्पर्धा खेळविली जात आहे. भारताने १९६८ पासून या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तिथेच १९७६ आणि १९८० या वर्षांत भारताने स्पर्धेत सहभाग नोंदविला नव्हता. या वर्षी एकूण ५ सुवर्ण पदके, आठ रौप्य, सहा कांस्य पदक भारताच्या नावे आहेत.
बॅटमिंटनच्या ७ पैकी चार खेळाडूंनी आणली पदकं बँटमिंटन हा खेळ पहिल्यांदाच पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी करण्यात आला होता. भारतातून इथे एकूण सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. विविध गटांमध्ये सहभागी झालेल्या या खेळाडूंपेकी एकूण चार जणांनी पदके जिंकली. प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण, सुहास यथिराज यांनी रौप्य आणि मनोज सरकार यांनी कांस्य पदक जिंकलं.
१६३ देशांतील ४५०० खेळाडू सहभागी
पॅरालंपिक खेळांमध्ये १६३ देशांपैकी एकूण ४५०० खेळाडूंनी २२ खेळांच्या ५४० स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.