अनभिज्ञतेचे आदर्श

    21-Sep-2021
Total Views | 165

mva_1  H x W: 0
 
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातमिळवणीने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत. मात्र, एकाच्या भानगडीत दुसर्‍याने पडायचे नाही, ज्याच्या-त्याच्या भानगडी ज्याने-त्याने निस्तरायच्या आणि प्रत्येकानेच दुसर्‍याच्या भानगडीबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवायचे, याबाबत मात्र एकमत आहे. आताच्या किरीट सोमय्यांविरोधातील बेकायदेशीर कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेली अनभिज्ञतेची ग्वाही त्याचाच दाखला.


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यांच्याविरोधात आपण १००  कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत, तसेच त्यांनी अधिक माहितीसाठी कागल-कोल्हापुरात यावे, असे आव्हान हसन मुश्रीफ यांनी दिले. तथापि, हसन मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची फक्त धमकीच दिली, त्यांनी अजूनही किरीट सोमय्यांविरोधात दावा ठोकल्याचे समोर आलेले नाही. पण, किरीट सोमय्या यांनी मात्र हसन मुश्रीफ यांच्या आव्हानाला तत्काळ प्रतिसाद देत कोल्हापूर दौरा करण्याची हिंमत दाखवली. मात्र, मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, आपल्या सहकारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या तोंडाला फेस आणणारे किरीट सोमय्या कोल्हापुरात आले, तर आपल्याच मतदारसंघात, आपल्याच जिल्ह्यात, आपल्याच माणसांना आपली असलियत कळेल आणि आपली अब्रू धुळीला मिळेल, अशी भीती हसन मुश्रीफांना वाटली. त्यामुळे रुग्णालयात कसल्याशा आजारावर उपचार करून घेतानाच हसन मुश्रीफांनी आपल्या समर्थकांना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लावले व त्यांच्या माध्यमातून, किरीट सोमय्या कोल्हापुरात येऊ नयेत, ते कोल्हापुरात आल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, किरीट सोमय्या कोल्हापूरवासीयांना आव्हान देत आहेत, त्यांना त्याचे उत्तर कोल्हापुरी भाषेत दिले जाईल, खिंडीत गाठून गनिमी काव्याने कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल, अशा धमक्या दिल्या गेल्या.
त्याच आधारे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी रविवारी किरीट सोमय्यांविरोधात जिल्हाबंदीचा आदेश जारी केला. मात्र, कोल्हापूर जिल्हाबंदी असताना इकडे महाविकास आघाडी सरकारने आगावूपणा करत किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर १०० पेक्षा अधिक पोलिसांना वेढा घालू दिला. किरीट सोमय्यांनी घराबाहेर पडू नये व कोल्हापूरला जाऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने दंडुकेशाहीचा वापर करत त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना सहा तास घरात कोंडून ठेवले. पण, महाविकास आघाडी सरकारच्या दमनशाहीला न जुमानता किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचले, तर तिथेही पोलिसांनी त्यांना रोखले. एकीकडे मुंबईत दहशतवादी सक्रिय झालेले असताना त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याऐवजी किरीट सोमय्यांना कोल्हापूरला जाण्यापासून अडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पोलिसांची फौज कामाला लावली. पण, तरीही किरीट सोमय्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ने कोल्हापूरकडे रवाना झाले. मात्र, किरीट सोमय्यांच्या कोल्हापुरात पोहोचण्याच्या शक्यतेने धडकी भरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या हाताखालील पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले व पुन्हा मुंबईला पाठवले. अर्थात, हसन मुश्रीफांवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकल्याचे स्पष्ट होते. त्यातूनच संजय राठोड व अनिल देशमुखांनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामारूपी बळी जायला नको म्हणून जो आरोप करतो, त्याच्यावरच कारवाई करण्याचा घटनाबाह्य उद्योग महाविकास आघाडी सरकारने केला. मात्र, किरीट सोमय्यांविरोधात घडलेल्या या सगळ्या प्रकारापासून, कारवाईपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनभिज्ञ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अनभिज्ञतेच्या आदर्शांचा गोतावळाच जमा झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.

 
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातमिळवणीने ‘भाजपविरोध’ या एकमेव किमान समान कार्यक्रमाआधारे सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत. मात्र, तिन्ही पक्षांत कितीही मतभेद असले तरी एकाच्या भानगडीत दुसर्‍याने पडायचे नाही, ज्याच्या-त्याच्या भानगडी ज्याने-त्याने निस्तरायच्या आणि प्रत्येकानेच दुसर्‍याच्या भानगडीबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवायचे, याबाबत मात्र एकमत आहे. त्यामुळे शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे वा माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले की, त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते सांगतात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाले की, शिवसेना व काँग्रेसचे नेते आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतात. गेल्या वर्षी अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील घराचे तोडकाम केले गेले, तर पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. तेव्हाही, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने हात झटकले होते व आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले होते. आताच्या किरीट सोमय्यांविरोधातील बेकायदेशीर कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेली अनभिज्ञतेची ग्वाही तिन्ही पक्षांतील याच अनभिज्ञतेच्या समझोत्याचा दाखला म्हटला पाहिजे.
 
गृहमंत्रालयाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, असे वाटत असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल, असेही उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. मात्र, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्याच सरकारमधील मंत्री काय करतात, कोणते निर्णय घेतात, याची माहिती नसल्याचे किंवा माहिती असली तरी त्यांना सरकारचा प्रमुख म्हणून त्याची कसलीही जबाबदारी घ्यायची नसल्याचे स्पष्ट होते. एकूणच, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अराजक माजल्याचे दिसून येते, म्हणूनच तालिबानी धोरणाने किरीट सोमय्यांविरोधात कारवाई केली जाते, तर भ्रष्टाचाराचे आणि अत्याचाराचेही आरोप झालेले नेते-मंत्री मात्र खुशाल मोकाट फिरतात. मुख्यमंत्र्यांकडून त्या कोणाहीविरोधात चौकशीची, तपासाची कारवाई होत नाही, कारण ते प्रत्येक घटनेपासून अनभिज्ञ असतात. पण, राज्यातील जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या कारभारापासून अजिबात अनभिज्ञ नाही. जनतेला या सरकारचे सारेच उद्योग चांगल्याप्रकारे माहिती आहेत आणि वेळ आल्यावर जनता त्यांना असलेला आपला विरोधही दाखवून देईलच.





 


 
अग्रलेख
जरुर वाचा
चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121