आयसीएमआर आणि आयआयटी मुंबईस दिली ड्रोन वापराची परवानगी
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशातील दुर्गम भागामध्ये आवश्यक त्या लशी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने 'मेडिसीन फ्रॉम द स्काय' या योजनेची सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि आयआयटी मुंबईला चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
ड्रोन वापरून 3000 मीटर उंचीपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर आणि नागालँडमध्ये प्रायोगिक कार्यकक्षेबाहेरील (बीव्हीएलओएस) लस वितरण करण्यासाठी आयसीएमआरला परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईला स्वतःच्या परिसरात ड्रोनचे संशोधन, विकास आणि चाचणीसाठी ड्रोन वापरण्याची परवानगी मिळाली आहे. ही सूट हवाईपट्टी वापराच्या अटी आणि शर्तींच्या अधीन असेल आणि त्या हवाईपट्टी वापराच्या मंजुरीच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल त्यानुसार वैध असेल.
यापूर्वी 11 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तेलंगणा राज्यातील विकराबाद येथे अशा प्रकारे पहिल्या 'मेडिसिन फ्रॉम द स्काय' अर्थात हवाईमार्गे औषध प्रकल्पाची सुरुवात केली होती, ज्याअंतर्गत ड्रोन वापरून औषधे आणि लसींचे वाटप केले जाणार आहे.