टोकियो : टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक २०२०मध्ये भारताने दुसरे सुवर्ण पदक पटकावले आहे. एफ ६४ प्रकारात सुमित आंतीलने विश्वविक्रमी भालाफेक करत देशासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे. हे भारताचे सातवे पदक ठरले असून आता भारताच्या नावावर २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे. यावेळी त्याने एकदा - दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा विश्व विक्रम मोडण्याचा पराक्रम केला आहे.
सुमित आंतीलने पुरुषांच्या एफ ६४ भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नात ६६.९५ मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटरसह नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिसऱ्या प्रयत्नात सुमित आंतील याने ६५.२७ मीटर लांब भालाफेक फेकला. पण इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याने याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली.
पाचव्या प्रयत्नात त्याने पुन्हा ६८.५५ मीटर लांब भाला फेकत पुन्हा स्वतःचाच विश्वविक्रम मोडला. या कामगिरीसह त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केला. याआधी, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया याने सोमवारी सकाळी रौप्य पदक जिंकले. तर दुसरा भालाफेकपटू सुंदर सिंह गुर्जर याने कास्य पदक जिंकले आहे. दरम्यान, भारताचे टोकियो पॅरालिम्पिकमधील हे सातवे पदक आहे. तर आजच्या दिवसातील हे पाचवे पदक ठरले.