मुंबई : युवासेनेचे माध्यम व जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी ४ जूनला पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्राच्या अनुषंगाने शिवसेना आणि आपणांस वाटणारा पंतप्रधान मोदीजींबद्दलचा हेवा व ईर्ष्या स्पष्ट दिसून येते असे म्हणत भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना खुले पत्र लिहिले आहे. यावेळी विक्रांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या महाराष्ट्रात 'VIP कल्चर' पुर्नजिवित केल्याबद्दल व आपल्या तौक्ते वादळानंतर केलेल्या धावत्या दौऱ्यावरून आणि महाराष्ट्रातील युवांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कोंडी यांसारख्या मुद्यांवरून समाचार घेतला.
पत्रात विक्रांत पाटील म्हणतात,भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या नावाने आपले १८ खासदार निवडून आले. मोदीजींच्या सत्तेच्या ७ वर्ष काळामधील ५ वर्ष तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत सत्तेचा भाग होतात आणि पंतप्रधान मोदीजींच्या नावाने आपले १८ खासदार निवडून आले हे ही आपण विसरलात. पंतप्रधान मोदींजीबाबत त्यांची बोलायची उंची तर नाहीच नाही पण कुवत पण नाही. तसेच यावेळी विक्रांत यांनी पुढील काही मुद्दे मांडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १८ महिन्यांत किती जनसंपर्क केला ?
स्वत:ला जनसंपर्क प्रमुख आणि माध्यम प्रमुख म्हणवणारे हर्षल प्रधान आपल्या पत्रात जनतेला सांगण्यास कमी पडले की, मुळात मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या १८ महिन्याच्या कार्यकाळात किती जनसंपर्क केला ? त्यांच्या 'कोकण दौऱ्याच्या' वेगाची तुलना तर 'तौक्ते चक्रीवादळा' सोबत केली जाते. तसेच जेव्हा ते स्वत: आपली आलीशान मर्सिडीज कार घेउन बाहेर निघतात, त्यावेळेस कुठलाही जनसंपर्क होऊ नये म्हणून संपूर्ण प्रशासनाकडून रस्ते जनमुक्त केले जातात आणि त्याकरिता ४०-४० मिनिटे जनतेला वेठीस धरले जाते. मुळात देवेंद्र फडणवीस सरकारानं बंद केलेल हे 'व्ही.आय.पी.' कल्चर महाराष्ट्रात पुनर्जीवित करण्यासाठी आपले व मुख्यमंत्र्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा-अठरा तास काम करतात याचे कौतुक केले जाते पण, ते देशापेक्षा पक्षवाढीसाठीच अधिक काम करतात असा जावईशोध त्यांच्या पत्रात लावण्यात आला होता. पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करतात? गमतीने त्यांना 'मॅटिनी मुख्यमंत्री' म्हटले जाते. इतकंच नाही तर एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही उद्धवजींनी मंत्रालयात पायच ठेवलेला नाही. ' माझं कुटूंब माझी जबाबदारी हीच त्यांची सर्वार्थानं प्राथमिकता असावी.
मनोरा आमदार निवासाची साधी वीटही लावली नाहीत
२० हजार कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल मोदीजींना टार्गेट करताना हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे की, तेवढ्याच पैशात देशातील नागरिकांना कोरोनाची लस देता आली असती. 'सेंट्रल व्हिस्टा' हा प्रकल्प देशाचा सर्वोच्च मानबिंदू आहे, त्याचे काम सुरूच राहील. केंद्राने सेंट्रल व्हिस्टामुळे अन्य ठिकाणचा निधी कुठेही कमी केलेला नाही. पण मुंबईतील मनोरा आमदार निवासाची साधी विटही महाविकास आघाडी सरकारला गेल्या दीड वर्षात लावता आलेली नाही. यामुळं राहण्याची जागा नसल्याने आमदारांचे काय हाल होतायेत ते त्यांनाच विचारा. आपल्या कार्यकाळात फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीचे कंत्राट रद्द केले आणि मुळ कंत्राट ६०० पासून ९०० कोटीवर नेले.
केंद्राला दोष देण्यापेक्षा आधी सिस्टम समजून घ्या!
मोदी सरकारने खतांचे दर वाढविले यासाठी दूषणे देताना आपले 'प्रधान' जी वाढीव खत दराचा फटका हा सामान्य शेतकऱ्यास बसू नये यासाठी मोदी सरकारने खतांच्या खरेदीवर सबसिडी दिली आहे हे नमूद करण्यास सोईस्कर विसरलेले दिसतात. दरवाढीसाठी केंद्राला दोष देण्यापेक्षा आधी त्यांनी सिस्टम समजून घेतली असती तर बर झाल असतं. पेट्रोल, डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असल्याची इतकी चिंता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला असेल तर त्यांनी या दोन गोष्टींवर असलेला ‘राज्याचा कर' १० रूपये कमी केला तर किंबहुना' राज्यातील जनतेला मोठा दिलासा आपणास देता येईल. असे केल्यास आपण फक्त राजकारणासाठी केन्द्रला उपदेश करत नाहीत असा विश्वास सामान्य जनतेला वाटेल.
मुंबई मॉडेलची पोलखोल !
कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आलय हे वाक्य ठोकल की वाहवा मिळते अशी धारणा आघाडी सरकारमधील सगळ्यांची झालीय. मोदी सरकारनं राज्यातील कोरोना रूग्णांना कोट्यवधी रूपयांची दिलेली मदत लपून राहू शकत नाही हे लक्षात घ्या. आपण कोविड हाताळण्याच्या श्रेयासाठी आकडेवारीची बनवाबनवी करून कशी स्वत:ची स्तुती करवून घेतली हे सांगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२०(१२,०७९) आणि एप्रिल २०२१ (१४,१६४) एकूण २६,२४३मृत्यूंची नोंद झाली. पण महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक २६,५३१ मृत्यू हे एकट्या मे २०२१मध्ये झाले आहेत. मे महीन्यातील अपयश लपवण्याकरिता दर आठवड्यातून नोंदणी मध्ये हेरफेर करून एका आठवड्यात ५०००मृत्यू (जुने अधिक) करण्यात आले. मे महिन्यात देशात एकूण मृत्यू १,१९,१८९ झाले. त्यात महाराष्ट्रातील २६,५३१ (२३%).महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी करण्यासाठी दुसरी पद्धत अवलंबविण्यात आली. ती म्हणजे ५५ टक्के चाचण्या रॅपिड अँटीजेन पद्धतीवर शिफ्ट करण्यात आल्या. एकंदर आकड्यांची हेरफेर करून तांत्रिक निकषावर असा आभास निर्माण करण्यात आला की उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्र मॉडेल किती यशस्वी आहे.
असे आहे मुंबई मॉडेल !
मुंबईत मे महिन्यात १७०१ मृत्यू झाले असले तरी ५१८ मृत्यू हे 'डेथ ड्यू टू अदर रिझन' या वर्गवारीत टाकले आहेत.एप्रिल महिन्यात ६६६आणि मे मधील ५१८ असे या दुसऱ्या लाटेतील २ महिन्यात एकूण ११८४ मुंबईतील मृत्यू हे या अन्य वर्गवारीत टाकण्यात आले. राज्यात या दोन महिन्यात १४४७ मृत्यू या वर्गवारीत होते. त्यात मुंबईतील ११८४ मृत्यू आहेत. म्हणजे हे प्रमाण ८२ टक्के इतके आहे.मुंबईत एप्रिल २०२१ या महिन्यात १२,९४,०६७चाचण्या करण्यात आल्या, मे २०२१ मध्ये त्या ८,१०,१३८ इतक्या आहेत. म्हणजे ४,८३,९२९ चाचण्या कमी झालेल्या आहेत. जर चाचण्या ३०-३५ टक्क्यांनी आधीच्या महिन्यापेक्षा कमी केल्या तर आपोआप रूग्णसंख्या कमी होणार तर असे आहे मुंबई मॉडेल !
राज्यातील युवावर्गाची परिस्थिती अत्यंत बिकट
आदित्यजी आपले बाबा हे मुख्यमंत्री आहेत हे आपलं मोठ सौभाग्य आहे आणि आपल्याला 'पुण्यवान' माणसाची पण साथ लाभलेली आहे. त्यामुळे आपले सरकारमधील सर्व कार्यभाग त्यांच्या माध्यमातून लगेचच मार्गी लागतात. आपल्याला कोणताही आर्थिक चटका सहन करावा लागत नाही. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील युवा वर्गांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून अनेकांचा रोजगार बुडला आहे. संपुर्ण राज्यातली परिस्थिती पाहता युवा वर्गाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक कोंडी झाल्यानं अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय.
केंद्रावरती अभ्यास न करता मुंबईबाहेरील महाराष्ट्रातील परिस्थिती समजून घ्या
आपण केंद्रावरती अभ्यास न करता मुंबईबाहेरील महाराष्ट्रातील परिस्थिती समजून घ्यावीत. आपल्या कार्यकाळात संजय राठोड यांना एका तरुण मुलीच्या आत्महत्येप्रकरणी घरी जावे लागले, अनिल देशमुख यांना शंभर कोटी खंडणीच्या आरोपात राजीनामा द्यावा लागला, अनिल परब हे आरोपांच्या घेऱ्यामध्ये अडकले आहेत. आणखीन एक दोन मंत्री चौकशीच्या रडारवर येऊ शकतात. आपल्याला तर याचा बोध असेलच कारण आपण यासगळ्याचे साक्षी आहात. तर मग असे सगळे महाविकास आघाडीचे प्रताप सुरु असताना केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वतःचे भ्रष्ट राजकारण झाकण्याची धडपड कशासाठी ? असा सवाल करत विक्रांत पाटील यांनी राज्यातील विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरेंवर टीका केली.