नवी दिल्ली : आधीच चीनचा जगाला दिलेला कोरोनारूपी प्रसाद कमी होत नाही, तेच की जगाची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात चीनने 'लॉंगमार्च ५ बी' हे रॉकेट अवकाशात सोडले होते. परंतु हे रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले असून ते पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. पुढच्या ४८ तासात हे रॉकेट पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या रॉकेटवर लागले आहे. मात्र, यापूर्वीही अशाप्रकारचा अंतराळ कचरा (स्पेस देब्रीस) पृथ्वीवर धडकला असून त्याने पृथ्वीवर कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
लॉंगमार्च ५ बी हे रॉकेट शनिवारी पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे रॉकेट जर शहरी भागात पडले, तर मोठा अनर्थ होऊ शकतो अशी शंका अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे रॉकेट १०० फूट लांब असून १६ फूट रुंद आहे. तर रॉकेटचे वजन २१ टन असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. चीनचे हे 'लॉन्ग मार्च ५ बी' हे रॉकेट ८ ते १० मे दरम्यान केव्हाही पृथ्वीवर पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
यावर अखेर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन या संदर्भात बोलताना टम्बलिंग स्पेस रॉकेट पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. परंतु रॉकेटमुळे कोणतेही नुकसान होणार शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच हे रॉकेट वातावरणाच्या कक्षेत आल्यावर त्याचे काही भाग जळला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या रॉकेटने त्याच्या नियोजित कक्षेत प्रवेश केला असून त्याच्या पुन्हा प्रवेशाकडे आम्ही लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.