सावरकर बंधूंच्या अंदमानातील सुटकेला २ मे, २०२१ रोजी १०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त संपूर्ण देशभर ‘काळे पाणी मुक्ती शताब्दी वर्ष’ विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. अंदमानमध्ये बंदीवासात सावरकरांनी काय केले? अंदमानातील सावरकर कसे होते? त्यांचे अंदमानातील कार्य समाजासमोर मांडावे, या हेतूने सावरकर साहित्याचे अभ्यासक, लेखक, व्याख्याते डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी ‘काळे पाणी मुक्ती शताब्दी वर्षा’च्या निमित्ताने आगामी वर्षभर ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर १०० व्याख्याने देण्याचा संकल्प केला आहे. सावरकरांच्या ‘आत्मार्पण दिना’पासून म्हणजे २६ फेब्रुवारी, २०२१ पासून या व्याख्यानांना सुरुवात झाली आहे. त्याविषयी...
मागील दोन तपांपासून डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर सावरकर विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करीत आहेत. ’दिवसभर सावरकर’ हा त्यांचा एक अभिनव उपक्रमदेखील त्यांच्यातील भिनलेले सावरकर स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. या उपक्रमाद्वारे बाहेगव्हाणकर आठवड्यातून एक संपूर्ण दिवस फक्त सावरकर साहित्याचा प्रचार आणि प्रसारासाठी खर्च करतात, त्यातही ज्या कुटुंबीयांना सावरकरांची माहिती नाही, त्यांना घरी जाऊन भेटतात. सावरकरांचे जीवनकार्य, त्यांचे साहित्य, देशासाठी केलेला त्याग, याची पूर्ण माहिती त्या कुटुंबाला देतात, वर सावरकरांची पुस्तकेही भेट देतात. हे काम सावरकरांच्या विचारांनी पूर्णपणे भारावलेला माणूसच करू शकतो. सावरकरांचा देशभक्तीचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, असे ते सांगतात.
एखादा माणूस विशिष्ट विचाराने किती भारावलेला असतो, याचा प्रत्यय बाहेगव्हाणकर सरांच्या घरात प्रवेश करताना येतो. अगदी प्रवेशद्वारासमोरच सावरकरांची भव्य प्रतिमा दिसते. हॉलमध्ये जिकडेतिकडे सावरकरच दिसतात. दर्शनी भागात सावरकरांचा छोटा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यापुढे अंदमानातून सावरकरांच्या कोठडीतून आणलेली पवित्र माती एका पात्रात ठेवलेली आहे. बाहेगव्हाणकर यांचा जन्म बीड येथे झाला, पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए. केले. पत्रकारितेची पदवी घेतली. १९९६ मध्ये बीड येथील सावरकर महाविद्यालयात इंग्रजी विविध विभागात अध्यापन सुरू केले. दुसरीकडे सावरकरांच्या समग्र साहित्याचा अभ्यासही सुरू ठेवला. ज्या ज्या ठिकाणी सावरकरांचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणांना भेटी देणे, सावरकरांवर व्याख्याने देणे असे उपक्रम त्यांनी सुरु ठेवले आहेत, ते अंदमानलाही जाऊन आले आहेत.
सावरकरांची जयंती आणि आत्मार्पण दिन यांचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात बोलावणे येईल त्याठिकाणी स्वखर्चाने जाऊन विनामानधन व्याख्यानं देण्याचा संकल्प डॉ. बाहेगव्हाणकर यांनी केलेला आहे. आतापर्यंत सावरकरांच्या जीवनकार्यावर एक हजारपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. ‘महाकवी सावरकर’, ‘विज्ञाननिष्ठ सावरकर’, ‘प्रज्ञावंत इतिहासकार सावरकर’, ‘सावरकरांची राष्ट्रभक्ती’, ‘समाज क्रांतिकारक सावरकर’, ‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी सावरकर’, ‘सावरकरांचा मानवतावाद’, ‘सावरकरांची भाषाशुद्धी’, ‘अर्थचिंतक सावरकर’, ‘शिक्षक सावरकर’, ‘अंदमानातील सावरकर’ अशा विविध विषयांवर व्याख्याने देत असतात.
२००८ मध्ये सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या ऐतिहासिक उडीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाहेगव्हाणकर यांनी ’सावरकरांची गरुडझेप’ या विषयावर १०० व्याख्याने मराठवाड्यातील शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारा एक ‘स्लाईड शो’ डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी तयार केला असून अनेक ठिकाणी याचे सादरीकरण करण्यात आलेले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास आणि त्यावर संशोधन झाले पाहिजे, यासाठी डॉ. बाहेगव्हाणकर यांनी आपल्या घरी समग्र सावरकर साहित्य लोकांसाठी खुले ठेवले आहे. ज्यांना कोणाला सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या साहित्य प्रकारावर संशोधन करायचे आहे, त्यांना मदत करण्याची इच्छा सर बोलून दाखवतात. महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ’स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे’ बाहेगव्हाणकर प्रमुख आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ’समग्र सावरकर’ हा ’शॉर्ट टर्म कोर्स’ ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आला. चार हजारांपेक्षा जास्त जणांनी या कोर्सला प्रवेश घेतला होता.
संपूर्ण देशभरातून यामध्ये सावरकरप्रेमी सहभागी झाले होते. त्याचबरोबर सावरकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून ’सावरकर चरित्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ घेण्यात येतो. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, तसेच डॉक्टर्स, वकील, पत्रकार, व्यवसायिक कर्मचारी यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. डॉ. बाहेगव्हाणकर यांनी विविध स्थानिक आणि विभागीय वर्तमानपत्रात सावरकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे १५० लेख प्रकाशित केले आहेत. मागील २५ वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे डॉ. बाहेगव्हाणकर यांचे कार्य अखंडपणे सुरू आहे. ’अंदमानातील सावरकर’ या विषयावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने आत्तापर्यंत एकूण ११ व्याख्याने देण्यात आलेली आहेत. येत्या वर्षभरात शंभर व्याख्यानांचा संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी व्यक्त केला आहे.