अंदमानच्या काळ्याकुट्ट अंधारातून सावरकरांचे विचाररूपी तेज सर्वत्र पसरत होते. त्या तेजाला साखळदंड किंवा 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा बद्ध करत नव्हती. शिक्षा भोगत असताना आपल्या धाकट्या बंधूंना पाठवलेली ही पत्रे म्हणजे अष्टविनायकच. अत्यंत रसाळ आणि तळमळीचे लेखन या पत्रांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे.-पहिल्या पत्रामध्ये एकलकोंड्या अंदमानच्या खडतर प्रवासातून जवळजवळ दीड वर्षांनी पत्र लिहिण्याची संधी सावरकरांना मिळाली. सावरकरांचे त्यातही विनोद बुद्धिचातुर्य दिसते. ते म्हणतात की, “अशा गतीने लिहिण्याची कला कोणीही विसरेल.” नारायणराव सावरकर यांची चौकशी करताना सावरकर म्हणतात की, “समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त असलेले प्राणिशास्त्र तू शिकावे. नारायणराव सावरकरांना बंगाल कसा काय वाटला आणि एखादी बंगाली भावजय त्यांना मिळाली तरी चालेल,” असे ते म्हणत आहेत. सावरकरांचा ‘आसिंधुसिंधू पर्यंता’ तत्त्वाची सुरुवात वैयक्तिक जीवनातून झालेली दिसून येते.
अखंड हिंदूराष्ट्रामध्ये जात, प्रांत, भाषा यांचे महत्त्व हिंदुत्वासमोर सावरकरांना गौण वाटते. आंतरजातीय तसेच प्रांतबाह्य विवाहांचा सावरकरांनी केलेला पुरस्कार दिसून येतो. आपली प्रकृती उत्तम आहे, हे कळवताना सावरकर तुरुंगाच्या अथवा कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची मनुष्याला दिलेली वृत्ती म्हणजे परमेश्वराची असीम कृपा आहे, असे मानतात. सावरकर प्राणायाम करताना शांत आत्म्याशी संवाद साधला जातो, असे म्हणतात. पत्राच्या शेवटी सावरकर भारतातील एकूण हालचाल विचारतात. राष्ट्रीय सभेतील राजबंदींच्या सुटकेसाठी ठराव, ‘टाटा’ कंपनीसारख्या अनेक बाबतीमधील औद्योगिक प्रगती, चीन, इराण पोर्तुगाल आधी राष्ट्रांचा ठावठिकाणा, गोखल्यांच्या शिक्षण ठरावासारखा निर्बंध सावरकर विचारतात. लोकमान्यांच्या सुटकेबाबतीत विचारणा, तसेच आपल्या कुटुंबीयांची विचारणा सावरकर पत्राच्या शेवटी करतात. दूर असूनसुद्धा सावरकर कोणालाही विसरले नाहीत आणि त्यांना प्रत्येक कुटुंबीयांची येणारी आठवण दिसून येते.
दुसर्या पत्रात नारायणराव सावरकरांना यौवनात व्यायाम करून शरीर सुदृढ राखण्याविषयी सावरकर सल्ला देताना दिसून येतात. तरुण वयात मौजमजा करण्यापेक्षा व्यायाम करून शरीर बळकट करण्याकडे सावरकरांचा असलेला कल दिसून येतो. अंदमानात हाल सोसत असतानासुद्धा नारायण सावरकरांना त्याची चिंता होऊ नये म्हणून सावरकर ‘माझी प्रकृती ठणठणीत असून मातृभूमीसाठी हे सत्कर्म करणे क्रमप्राप्त आहे,’ असे निश्चयाने सांगतात. नारायणरावांना त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता राखायला सांगतात. सावरकरांचे बंधुप्रेम इथे दिसून येते. कारावासामुळे सावरकरांचे मन खचलेले नाही, हेच दिसून येते. यमुना सावरकरांची चौकशी करत असताना सावरकरांचे पत्नीप्रेम, कुटुंबाप्रति तळमळ प्रकर्षाने जाणवते. येसूवहिनींच्या त्यागाला सावरकर सर्वोच्च बिंदू मानतात आणि पत्राचा निःशब्द शेवट होतो.
तिसर्या पत्रात नारायणराव सावरकर यांच्या पत्राच्या उत्तरादाखल पुस्तकांची एकूण संख्या विचारली आहे. जातीभेदाची कल्पना ही हिंदू जीवनपद्धतीचा प्रबळ प्रवाह खुंटून डबक्यात रूपांतरित करणारी आहे आणि शेंडा बुडखासह त्याचे उच्चाटन झाले पाहिजे, हा आग्रह दिसून येतो. “यावर्षी कोणालाही तसदी न देता तू एकटाच ये,” असे सावरकर तळमळीने सांगताना दिसून येतात. विज्ञाननिष्ठ सावरकर दिसून येतात ते म्हणजे, जगातील सर्वश्रेष्ठ सैनिकसत्तेशी युद्ध करण्यासाठी गेलेले हजारो हिंदी सैनिक युरोपात समुद्र ओलांडून गेले.
यावरुन परदेशी प्रवास करण्यासाठी सावरकरांचे असलेले प्रोत्साहन दिसून येते. हिंदी सैनिकांनी युरोपियन लोकांबरोबर केलेल्या युद्धातून आशियाचे हित साधेल, आपल्याबरोबर इतर राजबंद्यांचीसुद्धा मुक्तता व्हावी, याची तळमळ सावरकरांमध्ये दिसून येते. दयेची याचना न करता मागण्या कराव्यात; अन्यथा कुठल्याही राजबंद्याला मुक्तता मिळणार नाही, असे परखड मत सावरकर मांडतात. वैद्यकशास्त्राचा अभ्यास नारायणराव लवकरच पूर्ण करणार होते आणि त्यांची काळजी घेण्याची आपुलकीने सावरकरांनी चौकशीही केली आहे.
चौथ्या पत्रामध्ये गृहस्थी जीवनात प्रवेश केलेल्या नारायण सावरकरांचे अत्यंत प्रेमपूर्वक अभिनंदन करतात. “शील संपादन आणि ज्ञानार्जनाचा काळ पार पाडल्यानंतर येणार्या वैवाहिक जीवनात कौटुंबिक सौख्याची दृष्टी तुमच्यावर असो,” असा आशीर्वाद ते देतात. मृत्यूनेसुद्धा मान खाली घालावी, असे सावरकर जीवन जगत असताना हे कार्यसुद्धा भारतमातेचे आहे आणि ते केलेच पाहिजे, असा दृढनिश्चय आदर्श आपल्यापुढे मांडतात. एकूण युद्धजन्य परिस्थिती पाहता, नारायणराव सावरकरांना भेट स्थगित करण्याचे सावरकर सुचवतात. यमुना सावरकरांची चौकशी सावरकर आठवणीने करतात आणि सगळ्या नातेवाइकांचीही आपुलकीने चौकशी करतात.
पाचव्या पत्रामध्ये सावरकरांचा जीवनविषयक दृष्टिकोन पाहायला मिळतो. क्षणभंगुरतेचे तत्त्व सावरकरांना संपूर्ण उमगलेले दिसते. नारायण सावरकरांना मुलगा झाल्याबद्दल सावरकरांचा आनंद दिसून येतो. देशासाठी आत्मयज्ञ करण्यासाठी तत्पर असलेले सावरकरांचे विचार दिसून येतात. सावरकरांचे एक पत्र आणि नारायणराव सावरकरांनी पाठवलेल्या बंगी गायब झाल्याचे सावरकर लिहितात. “डाक विभागात असे काम असेल तर त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ बसू नकोस,” असे सावरकर सांगतात. शासन व्यवस्थेमधल्या गहाळपणाला जाब विचारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला हवे, हा विचार पहिल्यांदा बहुदा सावरकरांचा!
नाशिकच्या प्रांतिक परिषदेमध्ये राजबंदीमुक्ती ठराव झाल्याचे कळताच सावरकरांना झालेला आनंद खरंच वाखाणण्याजोगा. आपले जीवन म्हणजे वैराण वाळवंट आहे, त्याच्यामध्ये चार-पाच हिरवाईची ठिकाणं आली तर हुरळून जाऊन तिथे बाग फुलवणे योग्य नाही. देवांच्या माळेकरिता पुष्प असतात हे लक्षात ठेवून वागावे आणि आपले जीवन मातृभूमीप्रति समर्पित करावे, हा कणखर दृढ आणि राष्ट्रवादी विचार सावरकरांचा दिसून येतो. अगदी सर्व मंडळींच्या तब्येतीची चौकशी करून आणि आपण कुठलीही परिस्थिती आली तरी तोंड द्यायला समर्थ आहोत, असा विश्वास नारायणराव सावरकरांना दर्शवतात. क्रांतियज्ञामध्ये उडी मारणे हेच इष्ट कर्तव्य.
कोणतेही कृत्य राजकीय किंवा वैयक्तिक याचा भेद त्याच्या मुळाशी असलेल्या हेतूवरूनच करता येतो. यासंदर्भात नारायण सावरकरांना राष्ट्रीय सभेला लिहिण्यास सांगतात. सावरकर अस्थिपंजर होत चालले होते. आपल्यासारख्या अनेक राजकैद्यांविषयी असलेली तळमळ येथे दिसून येते. सावरकर यांची प्रकृती क्षीण होत चालली होती, तरी “काळजी करण्याचे कारण नाही,” असे दिलासादायक उद्गार सावरकरांनी काढले आणि सहाव्या पत्राचा शेवट झाला. तब्येत कितीही खराब झाली, तरी सकारात्मक दृष्टिकोन आणि मातृभूमीप्रति आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचं सावरकरांचे धैर्य खरंच अनन्यसाधारण. हिवताप आणि येणारा अशक्तपणा, सतत होणारे पोटात बिघाड, ताप आता नित्याचेच झाले होते. एकूणच राजकीय बंदी सोडविण्याची मनापासून इच्छा सरकारला नाही. एकूणच सावरकरांच्या मुक्ततेचा संभव नाहीसा होत आहे, हे लक्षात येत होते. यमुनाबाईंच्या त्यागाविषयी सावरकर म्हणतात की, “तिने माझ्यासाठी सतीप्रमाणे हे जीवन स्वीकारले. प्रत्येक हिंदू स्त्री म्हणजे सीतेची आवृत्ती असते. ही आवृत्ती कुठल्या ना कुठल्या रूपात आहुती देत असते.” यावरुन सावरकरांचे स्त्रीदाक्षिण्य दिसून येते.
दि. ६ जुलै, १९२० हे सावरकरांचे आठवे पत्र सुरू होते. बाबाराव सावरकर यांची प्रकृती खालावत चालली होती. बंदीमुक्तीचे उदक सुटून शेकडो कैदी मुक्त होत होते, याचा सावरकरांना आनंद होत होता. क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर सावरकर आणि त्यांचे बंधू असले तरी इतर कैदी मुक्त होत आहेत, याचा सावरकरांना मनस्वी होत असलेला आनंद त्यांच्या निस्सीम आणि निरपेक्ष देशभक्तीवर प्रकाश टाकतो. जिथे सर्व स्त्री-पुरुषांना पृथ्वी, आकाश, प्रकाश मिळेल, विश्वकुटुंब आणि राष्ट्रसमूह एकत्र येऊन अभिमानाने जगू शकतील, हे ध्येय ठेवून सावरकर झगडले. परकीयांनी येऊन भारतभूमीवर अधिकार गाजवावा, याच्यापेक्षा इथल्याच जातीभेदाचे आणि अस्पृश्यतेचे पाश सावरकरांना खुपत असत. त्यांच्या वैयक्तिक सुटकेची त्यांनी कधीही आस धरली नाही आणि ती बळावूसुद्धा दिली नाही. नारायणराव सावरकर यांची प्रकृती उत्तम असेल, अशी अपेक्षा करून सावरकर आठवं आणि शेवटचं पत्र संपवतात. जिच्यामुळे देश सार्वभौम होतो, संपन्नता राष्ट्रात नांदते, अशा स्वातंत्र्यलक्ष्मीला सावरकरांची विद्वत्ता सरस्वतिरूप अर्पण होती.
त्यांचे समग्र जीवन केवळ दोन वाक्यांत व्यक्त करायचे झाले तर फक्त एवढंच म्हणावंसं वाटेल-तुझसाठी मरण ते जननतुजविण जनन ते मरणतुज सकल चराचर शरणश्री स्वतंत्रतेज
- मधुरा कुलकर्णी
९५५२४८६८३१