मुंबई : लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
लसीकरणापासून एक मोठा वर्ग अद्यापही वंचित आहे. लसीकरणाचा तुटवडा, लसीकरण केंद्रांवर लॉकडाऊनमुळे पोहोचण्यास येणाऱ्या अडचणी पाहता लसीकरण प्रक्रीयेला तूर्त गती येणे अशक्य आहे. किमान मुबलक लसीकरण साठा उपलब्ध होईपर्यंत मुंबईतील सोसायट्या, वस्त्यांमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यासाठी सुसज्ज यंत्रण व मार्गदर्शक प्रणाली तयार करावी म्हणून खासदार कोटक यांनी २९ एप्रिल रोजी पत्र लिहीले होते.
त्यानुसार, आयुक्तांनी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. "मुंबईत डोअरस्टेप लसीकरणाची पॉलिसी पीसीव्हीसी मार्फत गृहनिर्माण संस्थांना (इमारतींना) मिळाली आहे. मुंबईचे आयुक्त इकबाल चहल यांनी घेतलेली ही भूमिका नागरिकांना लसीकरण्याच्या दिशेने जोडण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. आम्ही मुंबईकरांना सेवा देण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करीत आहोत, असे म्हणत खासदार मनोज कोटक यांनी आयुक्तांचे आभार मानले.