
"गुजरातचे पत्र दाखविता, महाराष्ट्राचे लपविता?", दरेकरांचा सवाल
मुंबई (सोमेश कोलगे) : आज पुन्हा एकदा केंद्राच्या कडे बोट दाखवण्याचे नवाब मलिक यांनी प्रयत्न केले.त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांना पुरावा दाखविण्याचे आव्हान केले होते. रेमेडिसीवरच्या विक्रीसाठी केंद्र सरकार नकार देत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील पुरावे दाखविण्याचे आव्हान नवाब मलिक यांना केले होते.
नवाब मलिक यांनी ट्विट करून एक पत्र प्रसिद्ध केले होते. ज्यात रेमडीसिवीरच्या गुजरातमधील वितरणाचा आदेश होता. वस्तुतः हा आदेश गुजरातच्या आयुक्तांनी चार दिवसांपूर्वी गुजरातकरिता दिलेला होता. मात्र नवाब मलिक यांनी केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे, असे आरोप केले. आता त्यानंतर नवाब मलिक यांचा खोटेपणा प्रवीण दरेकर यांनी उघड केला आहे. संबंधित पत्र गुजरातचे आहे, हे पुराव्यानिशी प्रवीण दरेकर यांनी दाखवून दिले आहे. सोबत प्रवीण दरेकरांनी महाराष्ट्र सरकारचे एक आदेशवजा पत्र जोडले आहे. ज्यात काल म्हणजेच 16 एप्रिल रोजी रेमेडिसीवर संबंधित API च्या वितरणाला परवानगी दिल्याचे समजते.
महाराष्ट्र सरकारने ही परवानगी आधीच का दिली नाही ?
गुजरातने ज्या वितरणविषयक परवानगी चार दिवसांपूर्वी दिल्या. त्याच परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इतके दिवस का लावले, हा प्रश्न आता या प्रकरणातून उपस्थित राहतो आहे. नवाब मलिक यांचे आरोप आता बूमरॅग होताना दिसत आहेत.