‘अ‍ॅस्ट्रोप्रिन्युअर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021   
Total Views |

Shweta Kulkarni_1 &n
 
आपली आवडच आपले जीवनध्येय ठरवून १८ वर्षांची एक मुलगी चक्क कंपनी स्थापन करते. त्या कंपनीची ‘सीईओ’ म्हणून अत्यंत जबाबदारीपूर्वक व्यवसायातही नेटाने उतरते. खगोलशास्त्राचे अजूनही शिक्षण घेणारी आणि कित्येक खगोल जिज्ञासूंना घरबसल्या अंतराळाचे धडा देणार्‍या ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’ या संकेतस्थळाची सर्वेसर्वा श्वेता कुलकर्णी. त्यामुळे आवड, शिक्षण, समाजसेवा आणि उद्योग यांना इतक्या कमी वयात एका धाग्यात गुंफणार्‍या या ‘अ‍ॅस्ट्रोप्रिन्युअर’ची ही यशोगाथा...
 
 
लहानपणी ग्रह-तारे, सूर्य-चंद्र आणि एकूणच खगोलविश्वाचे कित्येक मुलामुलींना प्रचंड आकर्षण असते. त्यातच सध्या एका क्लिकवर खगोल माहितीचा संपूर्ण खजिनाही सहज उपलब्ध होतो. पण, फार कमी जिज्ञासू या खगोलक्षेत्रासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचतात. श्वेता ही त्यापैकीच एक...
 
 
 
सर्वसामान्य मराठी सुशिक्षित कुटुंबात जन्मलेली श्वेता. वडिलांची सरकारी नोकरी, तर आईला नॅचरोपॅथी, योगापासून ते अगदी ग्राफोलॉजी, सायकोलॉजी क्षेत्रातील कामाचाही दांडगा अनुभव. त्यातच लहानपणापासून श्वेताला वाचनाचा छंद. त्यामुळे फक्त खगोलशास्त्रासंबंधी नाही, तर विविध विषयांची पुस्तकं लहान वयातच श्वेताच्या डोळ्याखालून गेली. जयंत नारळीकरांची विज्ञानरंजनाची सगळी पुस्तकं तिने पालथी घातली. वाचनातून अंतराळविषयीचं तिचं हे वेड वयाप्रमाणेच वाढतं गेलं. खगोलशास्त्राची आवड लक्षात घेता श्वेताचे वडीलही तिला आवर्जून ग्रह-तार्‍यांच्या, राकेश शर्मा, सुनीता विल्यम्सच्या प्रेरणादायी गोष्टी सांगायचे. श्वेता अमरावतीला असताना लहानपणी मोकळ्या निरभ्र रात्रीच्या आकाशाखाली पाहिलेल्या उल्कावर्षावाची ती आठवण अजूनही तिच्या मनात तितकीच लख्ख चमकते. अकरावीत आई-वडिलांनी वाढदिवसाची भेट म्हणून दिलेल्या टेलिस्कोपमधून श्वेता खगोलाचे अंतराळ डोळ्यात साठवत होती. चंद्र-सूर्यग्रहणाच्या वेळी नातेवाईक, मित्रमैत्रिणींसोबतही आकाशदर्शनाचा तिचा कार्यक्रम अगदी ठरलेलाच. आकाशदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहता, सशुल्क कार्यक्रमही श्वेताने हाती घेतले. सुरुवातीला ‘एवढीशी मुलगी आम्हाला एवढ्या मोठ्या अंतराळाविषयी काय ते सांगणार?’ म्हणून हिणवणारे आणि ‘इतक्या लहान वयात हिला एवढी माहिती,’ म्हणून कौतुकवर्षाव करणारेही श्वेताला भेटले. मग काय, आपल्या या आवडीचे रूपांतर उद्योगात करायचे श्वेताने ठरविले. सांगलीतील ‘एसएचके ट्रस्ट’ नावाच्या संस्थेला पुण्यात ‘विज्ञान’ विषयात विस्तार करायचा होता. त्यांनी त्यासाठी श्वेताकडे विचारणा केली व तिनेही होकार कळवला. मग ‘अ‍ॅस्ट्रॉन एसएचके ट्रस्ट’ची २०१३ साली नोंदणी झाली. त्यावेळी श्वेताचे वय वर्ष होते अवघे १८ आणि ती या ट्रस्टची ‘सीईओ’ म्हणून काम पाहू लागली. आकाशदर्शन, अंतराळविषयक जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून श्वेताने हाती घेतले. २०१८मध्ये ‘आयआयएम बंगळुरू’ मध्ये ‘महिला आणि नेतृत्व’ या परिषदेत सहभागी श्वेताला तिने हाती घेतलेले काम ही केवळ तिची आवड नव्हे, तर ते उद्योजकतेच्या चौकटीत बसणार असल्याचे लक्षात आले. त्यातच पुढे २०१८ साली जाहीर झालेल्या ‘वूमन स्टार्टअप प्रोगाम’साठी देशभरातून आर्थिक साहाय्य आणि प्रशिक्षणासाठी सात हजार महिलांनी अर्ज केला होता. त्यामध्ये पहिल्या १०० महिलांमध्ये श्वेताची निवड झाली. त्यासाठी पूर्वअट होती ती नोंदणीकृत संस्थेची. मग श्वेताने ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’ ही ‘फॉर प्रॉफिट’ संस्था रजिस्टर केली.
 
 
 
www.astronera.org या संकेतस्थळावर खगोलशास्त्रविषयक सर्व प्रकारची माहिती अगदी सोप्या आणि आकर्षक छायाचित्रे, व्हिडिओजसह उपलब्ध आहे. केवळ माहितीच नाही तर ‘बिगिनर’, ‘इंटरमिजिएट’, ‘अ‍ॅडव्हान्स’ असे काही कोर्सेसही माफक शुल्कात या संकेतस्थळावर आहेत. अगदी टेलिस्कोप कसा विकत घ्यावा, अंतराळात आपले नेमके स्थान काय, टेलिस्कोपशिवाय खगोलशास्त्राचा अभ्यास कसा करावा, असे विविध विषय कल्पकतेने ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’वर मांडण्यात आले असून, तरुणांचा या कोर्सला चांगला प्रतिसादही लाभतो. रघुनाथ माशेलकर आणि इतर तज्ज्ञमंडळींचेही श्वेताला यासाठी मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, या कोर्समध्ये भारतीय खगोलशास्त्र आणि संशोधनावर भर दिला असून, यापैकी दोन कोर्सेस मराठी आणि हिंदीतही अनुवादित केले आहेत. हा ऑनलाईन कोर्स पूर्ण झाल्यावर ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’तर्फे सहभागींना त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. आजघडीला 95 देशांतल्या विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नोंदणी केली असून दोन हजारांपेक्षा जास्त मुलांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे. तसेच आजघडीला इंटर्न्ससकट एकूण १७ जण ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’साठी पूर्णवेळ कार्यरत आहेत.
 
 
 
खगोलशास्त्रावर अशाप्रकारे ऑनलाईन ज्ञानार्जन करणे शक्य असले तरी भारतात या विषयाला केंद्रित एकही अभ्यासक्रम नाही. याविषयी श्वेता सांगते की, “भारतात ‘बॅचलर्स’ स्तरावर ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी’चा अभ्यासक्रम कुठल्याही विद्यापीठात शिकवला जात नाही. पण, या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मग तुम्हाला ‘बीएससी भौतिकशास्त्र’ किंवा ‘बीएससी गणितशास्त्र’ असे दोन पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ची निवड करावी लागते, कारण ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी’ हे स्पेशलायझेशनच नाही.” श्वेतानेही बारावीनंतर एक वर्ष ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’चा अभ्यास केला. पण, तिचं मन त्यात रमलं नाही. मग श्वेताने ऑनलाईनच आठ-दहा विद्यापीठांचे खगोलशास्त्राशी संबंधित कोर्सेस केले. बारावीनंतर ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंटर लँगशेअर’ ‘बीएससी अ‍ॅस्ट्रोनॉमी’ची ऑनलाईन डिग्री देत असल्याची माहिती तिला समजली. हा अर्धवेळ कोर्स असून साधारण पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. श्वेताही सध्या हा कोर्स पूर्ण करत असून या सर्वंकष ज्ञानाचा तिला ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’साठी आणि इतरांना मार्गदर्शन करताना भरपूर उपयोग होतो. त्यामुळे भविष्यात ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’ ही जगभरातील खगोलशास्त्रज्ञांची एक मोठी ‘कम्युनिटी’ झाली पाहिजे, जिथे या विषयाचे प्राध्यापक, जाणकार खगोलशास्त्रासंबंधी विविधांगी मजकूर अपलोड करतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल, असा श्वेताचा मानस आहे.
 
 
 
त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये तसेच रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांबरोबही ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’तर्फे खगोल मार्गदर्शनाचे उपक्रम, प्रशिक्षण आयोजित केले जातात. या सगळ्यातही श्वेता सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून वनवासी पाड्यांमध्ये आकाशदर्शनासारख्या कार्यक्रमांचे अगदी निःशुल्क आयोजन करते. तसेच ‘अ‍ॅस्ट्रोटेन्मेंट’ या त्यांच्या वार्षिक इव्हेंटमध्ये अगदी आठ ते ८० या वयोगटातील सर्वांसाठी तीन दिवसांचा खगोलशास्त्राशी संबंधित कॅम्पही आयोजित केला जातो. श्वेताचा आजवरचा प्रवास सुकर झाला, तो केवळ तिच्या आई-वडिलांच्या प्रेरणेमुळे आणि आधारामुळे. त्यामुळे, “पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी वेळीच ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे श्वेता आवर्जून नमूद करते. श्वेताही अभ्यासात फार हुशार नव्हती किंवा शाळेच्या दिवसांत मित्रमैत्रिणींचा गराडाही नव्हता. पण, एक लक्ष्य निर्धारित करून ती खगोलविश्वात रममाण होत गेली. ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी’ आणि ‘आंत्रप्रिन्युअर’चे असे हे ‘अ‍ॅस्ट्रोप्रिन्युअर श्वेता कुलकर्णी’ नामक अपार ऊर्जेने भरलेले एक रसायन. श्वेताचे खगोलशास्त्र आणि एकूणच आयुष्याबद्दलचे विचारही अगदी स्पष्ट आणि वैज्ञानिक. स्वत:ला १०-२० वर्षांनंतर कुठे बघतेस?, असा प्रश्न विचारताच हजरजबाबी श्वेता लगेच म्हणते की, “माझी अशी इच्छा आहे की, मी आज जे काम करतेय, ते मला जास्त काळ करावं लागू नये. लोकांना याचं महत्त्व वेळीच कळेल.” तेव्हा, उद्योगव्यवसायात उतरण्यासाठी वयोमर्यादेचे बंधन नसते, उद्योजकतेसाठी लागते ती कल्पकता आणि ध्येयपूर्तीची जिद्द आणि हाच ठरतो श्वेताच्या यशाचा मूलमंत्र...!
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
मी, हे करू शकते, तर कुणीही करू शकतं. स्वत:ला ओळखायला शिका. फायनल डेस्टिनेशन इज हॅप्पीनेस. पॅशन फोलो करा, हार्ट फोलो करा, बट कीप युअर ब्रेन अलाँग. जस्ट एन्जॉय युअर लाईफ...जर्नी इज दी डेस्टिनेशन...
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@