मलंगगडावर हिंदूधर्मीयांना आरती करण्यास मज्जाव
कल्याण ( जान्हवी मोर्ये ) : मालाडमधील मालवणी येथे हिंदू दलित कुटुंबीयांना घर सोडून जाण्यासाठी काही जिहादी आणि कट्टरपंथीयांकडून धमकावले जात असल्याचे समोर आलेले असतानाच, हिंदूधर्मीयांना आरती करण्यास कट्टरपंथीयांकडून मज्जाव केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.
कल्याण येथील मलंगगडावर होळीनिमित्त असलेल्या हुताशनी पौर्णिमेला आरती सुरू असताना काही जिहादी प्रवृत्तीच्या कट्टरपंथीयांनी त्यात व्यत्यय आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंदूधर्मीयांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास २ एप्रिल रोजी मोठ्या संख्येने मलंगगडावर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा हिंदू संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
कल्याणच्या मलंगगडावर हुताशनी पौर्णिमेला आरती होत असते. मलंगगडावर हिंदू मोठ्या संख्येने मलंग जागरणासाठी जाऊन आरती करीत असतात. होळीनिमित्त आलेल्या हुताशनी पौर्णिमेला हिंदू भाविक आरती करीत होते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार केवळ सात जणांच्या उपस्थितीत हिंदू भाविकांकडून आरती करण्यात येत होती. परंतु, अचानक आलेल्या काही कट्टरपंथीयांच्या जमावाने ही आरती थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बळ अपुरे असल्याने हे वातावरण अधिकच तीव्र होत गेले. अखेर दोन गट येथे आमने-सामने आल्याचे चित्र होते. अखेरीस हिंदू भाविकांनी कोणताही अनुचित प्रकार टाळून पोलीस ठाणे गाठले. आरतीस मज्जाव करणार्या कट्टरपंथीयांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदूधर्मीयांकडून होत आहे. पोलिसांनी चार दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास २ एप्रिल रोजी हिंदू भाविक मोठ्या संख्येने मलंगगडावर जातील, असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे. संघटनाच्या या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.