मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी धार्मिक हिंसेचे शिकार ठरलेल्या मालवणी भागातील “हिंदुंसोबत“ सोमवार दि.२९ मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले. गेल्या अनेक महिन्यांपासुन सांप्रदायिक हिंसा आणि कट्टरतावादाचे चटके बसलेल्या मालवणीकरांचं धुलिवंदन लोढांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ‘मंगल‘मय पद्धतीने साजरे झाले हे मात्र नक्की.
जानेवारी महिन्यात शहरातील मालाड उपनगरातील मालवणी भागात एका वस्तीतील काही हिंदू धर्मीयांवर घर सोडून जाण्यासाठी इतर धर्मीयांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. वस्तीतून घर सोडून जाण्यासाठी विविध प्रकारे हिंदू धर्मीयांचा छळ केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सदरील वस्तीतील कुटुंबीयांना हटविण्यासाठी तेथील हिंदु महिलांसोबत छेडछाड, धार्मिक कट्टरतेच्या आडून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचे प्रकार सुरू होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याप्रकरणाकडे दुर्लक्ष केले तरी विरोधी पक्ष असणार्या भाजपने मात्र यासाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. तेव्हा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार देत त्यांचं मनोधैर्य वाढवले होते.
त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा धुलिवंदनाच्या निमित्ताने झाली. हिंदु धर्मातील महत्वाच्या मानल्या जाणार्या धुलिवंदनाच्या निमित्ताने आमदार मंगलप्रभात लोढा हे मालवणी भागात धार्मिक हिंसेचे बळी ठरलेल्या कुटुंबियांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिले. विविध प्रकारची मिठाई आणि शुभेच्छा घेउन लोढांनी मालवणीकरांसोबत धुलिवंदन साजरे केले. मंगलप्रभात लोढांच्या या आपुलकीमुळे मालवणीकरांचं धुलिवंदन खरोखरच ‘मंगल‘मय झाले अशी प्रतिक्रिया मालवणीकरांनी दिली.