मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने रविवारी रात्री १२ वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना आजपासून दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी १ जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर ही मुदत ते दीड महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र आता FASTag अंमलबजावणीसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केले. त्यामुळे रविवारी रात्री १२ वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद ठेवण्यात येणार आहेत. कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
कसा खरेदी कराल FASTag?
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. FASTag खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह २२ बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही FASTag खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर FASTag खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.
…तर दुप्पट टॅक्स भरावा लागेल
जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.
किती आहे फास्ट टॅगची किंमत?
फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.