मुंबई : ओमिक्रॉन या नव्या विषाणूने कोण बाधित आहेत हे तपासण्यासाठी सात ते आठ दिवस जातात. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे का? हे तपासायला वेळ लागत आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महापौरांनी यामध्ये लक्ष घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. देशपातळीवर पंतप्रधान या विषयाकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नवा विषाणू पुढे येण्याच्या आधीचे नियम आणि विषाणू जगभरात आढळून आल्यानंतरचे नियम यामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी चर्चा करुन नियम ठरवले जात आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
राज्यामध्ये १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय हा नव्या विषाणूच्या उगमाआधी घेतला गेला होता. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो निर्णय घेण्यात आला होता. पण मुलांची सुरक्षितता, आरोग्याचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करुन पुढील निर्णय घेतले जातील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी या विषयासंदर्भात चर्चा करणार आहेत, असेही ते म्हणाले.
नव्या विषाणूसंदर्भात नवनवे दावे समोर येत आहेत. हा विषाणू कोविड-१९ आणि डेल्टा विषाणूपेक्षा वेगाने पसरत असला तरी तेवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नक्की सत्य काय आहे? हे जागतिक आरोग्य संघटना वा भारताच्या आरोग्य विभागाने तरी स्पष्ट करावे, अशी मागणीही यावेळी अजितदादांनी केली.
परदेशातून वा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी जी नियमावली करायची आहे, त्यात केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या नियमावलीत तफावत होती. ती तफावत आता दूर करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली. केंद्र आणि राज्याचे नियम एकसारखे असावेत, भारतातील कुठल्याही शहरातील विमानतळावर परदेशातून प्रवासी आल्यास त्यांच्यासाठी एकच नियम असावा, असा प्रयत्न आपण केलेला आहे. आता महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी ४८ तासांमधील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक असेल, अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिली.